विद्यापीठातील विनाअनुदानित अनेक अभ्यासक्रम होणार बंद

0
45
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही विनाअनुदानित अभ्यासक्रमाला मागील पाच वर्षापासून दोन किंवा तीनच प्रवेश आहेत. यामुळे अधिष्ठाता मंडळाने या अभ्यासक्रमांचा आढावा घेऊन काही अभ्यासक्रम बंद तर काही अन्य विद्याशाखांमध्ये समाविष्ट करण्याच्या शिफारसी कुलगुरुंकडे केल्या जाणार आहेत.

यासंदर्भात अधिष्ठाता मंडळाच्या सूत्रांनी सांगितले की, नॅक मूल्यमापनासाठी आलेल्या समितीने विद्यापीठावर आर्थिक भार असणारे अभ्यासक्रम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी अशा विनाअनुदानित अभ्यासक्रमांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिष्ठाता मंडळाला दिल्या होत्या. त्यानुसार सोमवार व मंगळवार सलग दोन दिवस या विषयावर अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

यामध्ये संस्कृत, जर्मन भाषा, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, एम. एफ. ए., संगणकशास्त्र विद्याशाखेतील एम. टेक., डान्स, म्युझिक, लाईफ लॉंग लर्निंग एम. ए. अशा अनेक विनाअनुदानित अभ्यासक्रमाला दोन किंवा तीनच विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत. यासाठी विद्यापीठ फंडातून तासिका तत्त्वावर अनेक शिक्षक नेमले जातात. हा आर्थिक भार कमी करण्यासाठी यातील सात-आठ अभ्यासक्रम बंद करण्यावर अधिष्ठाता मंडळाचे एकमत झाले आहे. प्र-कुलगुरू श्याम शिरसाठ हे लवकरच यासंबंधीचा अहवाल कुलगुरू डॉ. येवले यांच्याकडे सादर करणार आहेत. कुलगुरूंच्या अवलोकन आनंतर अधिष्ठाता मंडळाच्या शिफारसही विद्या परिषदेसमोर ठेवल्या जातील. त्यानंतर व्यवस्थापन समितीसमोर त्यावर अंतिम निर्णय होईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here