कराड तालुक्यातील अनेक गावे अंधारात ; वीज जोडणी करा अन्यथा तीव्र आंदोलन; सरपंचांचा इशारा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पालिका, नगरपंचायत यांच्या पथदिव्यांचे (स्ट्रीटलाईट) कोट्यवधीचे लाईट बिल थकल्याने ‘महावितरण’ने गावांची पथदिव्यांची वीज तोडली आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील ५० गावांचाही समावेश आहे. वीज तोडल्याने गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या गावातील अंधाराचे साम्राज्य नष्ट करावे. सरकारने ताबडतोब पथदिव्यांची विजबिले भरून स्ट्रीटलाईट सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात करू, असा इशारा कराड तालुक्यातील सुपने, वसंतगड अशा परिसरातील गावांतील सरपंच, उपसरपंचानी कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे याना निवेदनाद्वारे शुक्रवारी दिला आहे.

कराड तालुक्यातील वीज तोडलेल्या गावांतील सरपंच, उपसरपंचानी शुक्रवारी कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे यांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन दिले. यावेळी सुपनेतील सामाजिक कार्यकर्ते सरपंच शिवाजी पाटील, वसंतगड उपसरपंच अ‍ॅड. अमित नलवडे, पाडळीतील बाबासाहेब कळके, तांबवेचे माजी सरपंच जावेद मुल्ला, माजी उपसरपंच रवी ताठे, पश्चिम सुपने उपसरपंच अर्जुन कळंबे उपस्थित होते.

सरपंच व उपसरपंचानी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे कोट्यवधीचे लाईट बिल थकल्याने महावितरण कंपनीने गावांची पथदिव्यांची वीज तोडली आहे. वास्तविक ही विजबिले सरकार भरत आले आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांकडून दिवाबत्ती कर रीतसर वसूल केला जातो. असे असताना सरकारच्या अन्यायी कारभारामुळे आज गावोगावी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात सरकारचा हा कारभार म्हणजे “अंधेर नगरी चौपट राजा” अशी अवस्था झाली आहे. सरकारने या आधीही लॉक डाऊन काळातील विजबिले माफ करण्याचे आश्वासन न पाळता घरगुती, व्यवसाय, उद्योग यांची विज कनेक्शन तोडून कोरोनाच्या भयाण काळातही सामान्य लोकांवर अन्याय केला आहे. आता ग्रामपंचायतींना विकासकामांच्या निधीतून बिले भरण्याचे अन्यायी आदेश काढल्याने त्याचा ग्रामीण विकासावर ही परिणाम होणार आहे. पथदिव्यांची वीज खंडीत करून सरकार व ‘महावितरण’ने अगोदरच कोरोनात होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले आहे.