‘मराठा समाजानं EWS आरक्षणाचा लाभ घेऊन आरक्षणाचा विषय मिटवावा’- प्रवीण गायकवाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (SEBC) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरतीसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाचा फायदा SEBC वर्गात येणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थी व उमेदवारांना होईल. मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर लगेच त्या अनुषंगाने शासकीय आदेशही जारी करण्यात आला आहे. तर, मराठा समाजानं EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा आणि विषय मिटवून टाकावा, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय.

ईडब्लूएस आरक्षणाबाबतच्या निर्णयाबाबत प्रविण गायकवाड यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं. मराठा तरुणांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. मराठा समाजाला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असा लाभ मिळतोय. सगळं खासगीकरण होणार आहे, त्यामुळं सरकारी नोकरीच्या भरवशावर राहू नये. आरक्षणाच्या पलिकडे खूप मोठी स्पर्धा आहे. आता 85 टक्के नोकऱ्या खासगीकरणात आहेत. पहिल्यासारखं आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकरी सुरक्षित होती, असं आता राहिलेलं नाही, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.

तसेच, मराठा समाजानं आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण घ्यावं आणि आरक्षणाचा विषय संपवावा असं स्पष्टच शब्दात प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं. पुण्यात आज काही संघटनांनी राज्य सरकारच्या EWS आरक्षणाच्या निर्णयाची प्रत जाळून निषेध केला, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. मराठा समाजाला विशेष प्रवर्ग म्हणून आरक्षण देणे हे नव्या घटनादुरुस्तीनुसार शक्य नसून मराठा समाजातील मोठा वर्ग हा कुणबी म्हणून OBC आरक्षणाचा लाभ घेतोय. फडणवीस सरकारने केलेला SEBCचा मराठा आरक्षणाचा कायदाच चुकीचा होता. घटनेच्या चौकटीत असं जातीसाठी वर्ग न निर्माण करता दिलेल आरक्षण टिकू शकत नाही, असंही गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर, २०२० रोजी मराठा आरक्षणाला दिलेला अंतरिम स्थगिती आदेश विचारात घेऊन आजचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाजातील विद्यार्थी/उमेदवारांना EWS आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment