परळी | मराठा आरक्षणाची ठिणगी ज्या ठिकाणाहून पेटली त्या परळीतील ठिय्या आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. कारण परळीतील आंदोलकांनी मागणी केल्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत लेखी आश्वासन दिले आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या कार्यक्रमाचे लेखी आश्वासन दिल्या शिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी काल मेगा भरती रद्द करत असल्याचे सांगितले होते आणि त्या निर्णयाचे मराठा आंदोलकांनी स्वागत केले होते. तसेच नोव्हेंबर महिन्या पर्यंत मराठा आरक्षणाची सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे या निर्णयाकडे आंदोलकांनी सकारात्मक बघण्यास सुरुवात केली आहे.