मुंबई । मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार गंभीर दिसत नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चाने मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ही समिती बरखास्त करून या समितीत नव्या सदस्यांचा समावेश करावा, अशी मागणीही मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. (dissolve sub committee for maratha reservation)
मराठा आरक्षण उपसमितीचा मराठा समाजाला काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करून नव्या सदस्यांचा समितीत समावेश करावा. काम करणाऱ्यांनाच समितीत संधी देण्यात यावी, अशी मागणी आबा पाटील यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार गंभीर नाही. कोणत्याही मागणीवर आणि विषयावर सरकार गंभीर नाही. मुळात भूमिका घेण्यातच सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.
शरद पवारांनी पुढाकार घ्यावा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षाचं सरकार बनवण्यात लक्ष घातलं. आता त्यांनीच पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर आम्हाला विश्वास उरलेला नाही, असंही ते म्हणाले. राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती झाली. पण मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून ही भरती थांबवण्यात आली होती. पण आता सहा हजार नियुक्त्या करण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप करतानाच ही निवड प्रक्रिया थांबवण्यात यावी, अन्यथा मेट्रो कार्यालयात घुसून ही प्रक्रिया बंद पाडल्या जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
गनिमी काव्यानेही आंदोलन करू!
सरकारमधील काही ओबीसी नेते आंदोलनं पुकारून सरकार आणि जनतेची दिशाभूल करत आहेत. अशा नेत्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल. तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक देऊन हे उत्तर देऊ. निवेदनं देऊ आणि प्रसंगी गनिमी काव्यानेही आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिलाय.
कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in