हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maratha Reservation । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटलांची तब्ब्येत खालावली आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे सरकार पुढे पेच वाढला आहे. याच दरम्यान, सरकारच्या गोटातून एक महत्वाची माहिती समोर येतेय. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार कडून नवा GR सादर होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नवीन जीआर काढण्याच्या तयारीत आहे. ज्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र कायद्याने मिळू शकते त्यांना ते मिळण्यासाठीची सोप्पी प्रणाली कशी आणता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसचं कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक आणि कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या अॅफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. कुणबी नोंदी पडताळणीसाठी ग्रामपंचायत आणि तालुका लेव्हल वर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे बोललं जात आहे. यानंतर महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर मनोज जरांगे पाटील यांना नवीन मसुदा दाखवण्यात येईल आणि मग अंतिम निर्णय घेतला जाईल अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमिती, ॲडव्होकेट जनरल बीरेंद्र सराफ, न्या. संदीप शिंदे यांची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर वरील निर्णय झाल्याचे बोललं जात आहे. मात्र अजून तरी सरकार कडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
जरांगे पाटील यांच्या मागण्या काय ? Maratha Reservation
1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.




