पुणे । मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्याचे नैतृत्व सध्या खासदार छत्रपती संभाजीराजे करतानाचे चित्र दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यास सरकारला भाग पाडलं. तर संभाजीराजेंच्या नैत्रुत्वात मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन होत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजेंच्या भूमिकेवर संभाजी ब्रिगेडने नाराजीचा सुर लगावला आहे.
संभाजी ब्रिगडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजेंची भूमिका कशी दुटप्पी आहे. याबाबत प्रसार माध्यमात जाहीर वक्तव्य करत आहेत. त्यावर संभाजीराजेंनीही उलट प्रतिक्रिया दिल्यानं सध्या ब्रिगेड आणि संभाजी राजे आमने सामने आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सतिश भास्करराव काळे यांनी प्रवीण गायकवाड यांच्या मराठा समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा देत संभाजी राजेंवर टीकास्त्र सोडलं आहे. २००७ पूर्वी कुठे होता असा सवाल केला आहे.
नेमकं काय म्हणाले सतीश काळे?
”सुमारे ३० वर्षांपासून प्रविणदादा गायकवाड हे सार्वजनिक जीवनात काम करत आहेत. प्रविणदादा हे स्वभावाने अत्यंत मनमोकळे आहेत. ते नेहमी स्पष्ट बोलतात, त्यांच्या बोलण्यात परखडपणा, पण मनात गोडवा आहे पण ते तेवढेच परखड आहेत, याच स्पष्ट वक्तेपणाचा काही लोकांकडून चुकीचा अर्थ नेहमी काढला जातो त्याच जिवंत उदाहरण म्हणजे संभाजीराजे छत्रपती. प्रविणदादांनी संभाजीराजेंना घेऊन महाराष्ट्रभर नोव्हेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ या साली राजा आपल्या भेटीला “शिवशाहू रथ यात्रा” काढली होती. याच यात्रेदरम्यान संभाजीराजेंना भाषण करण्यासही प्रविणदादा यांनीच शिकवले होते. संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी व प्रविणदादा यांनी आपल्या जीवाचे रान केले होते.
प्रविणदादा हे पहिल्या पासूनच मानसे जोडण्याचे काम करतात. २००७ पूर्वी संभाजीराजे सर्वसामान्य जनते पुढे कधी आलेच नव्हते. पण प्रविणदादा यांनी संभाजीराजे यांना भेटून आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आहात आपण आपल्या समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून आपण आपल्या राजवाड्याच्या बाहेर आले पाहिजे असे म्हणून संभाजीराजेंना राजवाड्यातून बाहेर काढून महाराष्ट्रासमोर उभं करण्याचं काम प्रवीणदादा यांनी केल. याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी स्वतः आहे.
१९९२ पासून पुरंदर किल्ल्यावर मराठा सेवा संघाने संभाजी महाराज जयंती सुरु केली पण संभाजीराजे यांनी मात्र २०१२ पासून किल्ल्यावर यायला सुरवात केली. २००१ पासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा करत होती. आणि संभाजीराजे तिथीनुसार २००८ पर्यंत शिवराज्याभिषेक करत होते. परंतु असे दोन वेगवेगळे कार्यक्रम नको म्हणून प्रविणदादा यांनी संभाजीराज्याचं मनपरिवर्तन करून त्यांच्याच नेतृत्वाखाली २००९ पासून शिवराज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे सुरु करून त्याच नेतृत्व संभाजी राजेंकडे देण्यात आले.
२००४ साली रायगडावर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्टीत पुतळा संभाजी ब्रिगेड कडून बसवण्यात आला होता परंतु प्रशासनाकडून तो जप्त करण्यात आला. हिच गोष्ट संभाजी राज्यांच्या समोर मांडण्यात आली आणि पुन्हा त्याच जागेवर मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. १९९० पासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या नेतृत्वात आज पर्यंत शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी होत आहे. २०१४ पासुन संभाजीराजे किल्ले शिवनेरीवर येत आहेत. अलीकडे ती शिवजयंती शासकीय स्वरूपात शिवनेरीवर होताना दिसत आहे.
अलीकडे खासदार झाल्यावर २०१७ पासून संभाजी राज्यांनी दिल्ली येथे शिवजयंती सुरु केली आणि यामध्ये सक्रिय सहभाग सुध्दा हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा यांचा आहे. प्रविणदादांनी अनेक व्यक्ती, संस्था यांना आर्थिक मदत दिलेली आहे. तसेच जागा देऊनही मदत केलेली आहे, त्यांची मोठी यादी करता येईल. सर्व समाजातील अनेक नेत्यांप्रमाणेच प्रविणदादांच्या भूमिकेमुळे आज मराठा, एससी, ओबीसी, मुस्लिम यांच्यामध्ये सुसंवादाचे वातावरण आहे.
आजच्या तरुणांमध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा रुजविण्यात दादांचा वाटा मोठा आहे. मुळात प्रविणदादा पुण्यातील मुंढवा येथील एका जमीनदार शेतकरी कुटूंबातील आणि अलीकडे मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. शिवाजीराजांच्या महाराणी सकवारबाई या याच गायकवाड घराण्यातील होत्या. परंतु प्रविणदादांनी राजघराण्याचा लवलेश सुद्धा आपल्या बोलण्या चालण्यातुन कधी दाखवला नाही हाच त्यांचा मोठेपणा आहे.” असं सतीश काळे यांनी म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”