मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईस सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत याचिका सादर करण्याची परवानगी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर याविरोधात न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, मराठा आरक्षणाचा विषय आज न्यायालयात आल्यावर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे अनुपस्थित होते. त्यामुळे न्यायालयाने याविषयी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. मात्र संबंधित पक्षकारांना याचिका सादर करण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिली.
मराठा आरक्षणाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरकारने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सदावर्ते यांनी याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.