.. अन्यथा गनिमी काव्याने MPSCची परीक्षा केंद्रे फोडू; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सकल मराठा समाज आक्रमक बनला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला आहे. मराठा समाजाचा विरोध डावलून रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. याबाबत शुक्रवारी सांगलीत मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेऊन एमपीएससी परीक्षेला विरोध दर्शवला. राज्य सरकारने तातडीने परीक्षा फुढे ढकलावी, अन्यथा राज्यभर परीक्षा केंद्रे फोडून परीक्षा उधळून लावली जाईल, अशा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

याबाबत माहिती देताना सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विजय देसाई म्हणाले, ‘मराठा समाजाने विरोध दर्शवल्यानंतरही राज्य सरकारने पोलिस भरती प्रक्रिया जाहीर केली. हा प्रकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला उसकवण्याचा आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत रविवारी होणारी एमपीएससी परीक्षा स्थगित करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सरकार केवळ चर्चेचे नाटक करीत आहेत. विरोध डावलून परीक्षा घेतल्यास राज्यभरातील परीक्षा केंद्रे फोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास याला राज्य सरकार जबाबदार असेल.’ बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिका-यांसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका!- खासदार छत्रपती उदयनराजे
‘राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससीची परिक्षा घेण्याची एवढी घाई का? असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत उपस्थित केला आहे. तर, मराठा समाज जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. यांची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका,’ असा सूचक इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे.

.. म्हणून एमपीएससी परीक्षांना विरोध- खासदार छत्रपती संभाजीराजे
राज्यात सध्या एमपीएससी परीक्षांना काही मराठा संघटना तसंच काही परीक्षार्थ्यांकडून विरोध होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय लोकसेवा आयोगाची परीक्षा घेऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. तर दुसरीकडे दलित संघटनांसह इतरांनी परीक्षेसाठी आग्रह धरला आहे. परंतु लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला विरोध केवळ कोरोनामुळे करत असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं. कोरोना कमी झाल्यावर परीक्षा घ्यावी, असंही संभाजी राजेंनी सांगितलं. मात्र आधीच्या नियुक्त्या का दिल्या नाहीत, असा प्रश्नही संभाजीराजे यांनी विचारला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

 

Leave a Comment