Wednesday, October 5, 2022

Buy now

बारा राशींची परिभाषा मांडणारा “आलंय माझ्या राशीला” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपट नगरी | पृथ्वीतलावरच्या प्रत्येक स्त्री पुरुषाची स्वत:ची रास असतेच. मग ती कोणतीही असेल. इंग्रजीमधे त्याला Zodiac signs असंही म्हणतात. तर अशा एकुण बारा राशी. प्रत्येक व्यक्तीची रास वेगळी. या राशीनुसार प्रत्येकाचा स्वभावही वेगळा. काम वेगळं, वागणं, बोलणं, चालणं, समजणं, उमजणं हेसुद्धा निराळं. कळू लागण्याच्या वयात नाही म्हटलं तरी प्रत्येकाने कधी ना कधी वर्तमानपत्रांमध्ये स्वत:चं राशिभविष्य वाचलेलं असतच. यात काहीजण रोज पाहणारे असतात तर काहीजण सवडीनुसार लक्ष देणारे..आपल्या जगण्याची गोळाबेरीज राशीवर अवलंबून आहे असं मानणारे हे सगळे श्रद्धाळू लोक. रास पाहण्याची उत्सुकता ही अनेक जणांच्या सकाळच्या दिनक्रमाचा भाग बनलेली असते. मानवी मनाच्या याच वेगळेपणाची दखल घेणारा बिगबजेट मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

राशींची उत्सुकता जपणारा, त्या उत्सुकतेला अभ्यासाच्या, कुतुहलाच्या आणि विज्ञानाच्या आधारे सांधणारा – ‘आलंय माझ्या राशीला’ हा मराठी बिगबजेट चित्रपट बारा राशींच्या कथांवर आधारीत आहे. पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत सुप्रसिद्ध ज्योतिषी, ‘आनंदी वास्तुकार आनंद पिंपळकर यांनी हा चित्रपट दर्शकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात आणि एकंदरीत पाहता जगातच चित्रपट बनवणारे पहिले ज्योतिषी म्हणून आनंद पिंपळकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट हे मनोरंजनासोबत प्रबोधनाचं माध्यम असल्यानेच समाजासाठी उपयुक्त असा विषय घेऊन पिंपळकर यांनी चित्रपट निर्मितीत आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे.

एकूण बारा कथा असलेल्या “आलंय माझ्या राशीला” या चित्रपटात प्रत्येक राशीची एक वेगळी मज्जा मांडण्यात आली आहे. यातील बारा कथा एका मुख्य कथेला जोडण्यात आल्या असून आशयप्रधान चित्रपटाची निर्मिती करण्याचा आनंद यानिमित्ताने घेता आला असं आनंद पिंपळकर यांनी नमूद केलं. या चित्रपटातील विषय हे सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत काळजाला हात घालणारे आहेत. शहरीकरण, स्त्री-पुरुष नातेसंबंध, शेतकऱ्यांचे प्रश्न, मानवी मनोवृत्ती अशा प्रकारच्या संवेदनशील विषयांवर चित्रपट आपल्याला अंतर्मुख करेल असा विश्वास पिंपळकर यांनी व्यक्त केला आहे.

अभिनेते चिन्मय मांडलेकर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून त्यांच्यासोबतच अलका कुबल, मोहन जोशी, अतुल परचुरे, उषा नाईक, निर्मिती सावंत, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, मंगेश देसाई, दिगंबर नाईक, प्रसाद ओक, जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌ यांच्याही या चित्रपटात कसदार भूमिका आहेत. अभिनेते प्रणव पिंपळकर हे या चित्रपटातून आपलं मनोरंजन क्षेत्रातील पदार्पण करताना दिसून येतील. आपल्या पहिल्याच चित्रपटाचं जराही दडपण न घेता प्रणवने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. दैनंदिन जीवनात बहुतांश व्यक्तींना ज्योतिष आणि भविष्याबद्दल उत्सुकता असते. ज्योतिषविषयक हेच ज्ञान त्या व्यक्तीला हसत खेळत आणि चित्रपटाच्या माध्यमातुन मिळाले तर तो/ती व्यक्ती चित्रपटातील व्यक्तिरेखेमध्ये स्वत:ला पाहु शकते. चित्रपटात सहभागी कलाकारांनी प्रत्येकी एका राशीचं प्रतिनिधित्व केलं असून ही केमिस्ट्री झकास जुळून आल्याचं पिंपळकर यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

या चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी केलं आहे. चित्रपटाच्या एका मुख्य कथेभोवती बारा उपकथा जोडण्याचं जिकिरीचं आणि कल्पकतेचं काम लेखक हेमंत एदलाबादकर यांनी जीव ओतून केलं आहे. या लिखाणाला तितक्याच ताकदीने दिग्दर्शनाची जोड अजित शिरोळे यांनी दिली आहे. या सर्व बारा कथांचे निरुपण वेळोवेळी आनंद पिंपळकर स्वत: करणार आहेत.
चित्रपटात एकुण चार गाणी असून त्यामधील तीन मिनिटांच्या एका गाण्यात बारा राशींचा उल्लेख आला आहे. बारा राशींचे स्वभाव आणि वैशिष्ट्य एका गाण्यात खुबीने मांडण्याचं काम गीतकार कौतुक शिरोडकर यांनी सहजतेनं केलं आहे. मुग्धा कर्‍हाडे यांनी आपल्या मधुर आवाजात हे गाणं गायलं आहे.

प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकुर यांनी या चित्रपटातील साईबाबांच्या आरतीचं लिखाण केलं आहे. अभय इनामदार यांनीही एक गाणं लिहिलं आहे. चित्रपटातील सर्व गाण्यांना चैतन्य आडकर व प्रवीण कुंवर यांनी संगीत दिलं आहे. अजय अतुल यांनी संगीतविषयक मार्गदर्शन केलं असून अजय गोगावले यांच्या आवाजातील गाणंही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी हिंदीत ‘वॉट्स युवर राशी’ नावाचा सिनेमा आला होता. पण त्यामधे राशींबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. राशींवर एकपात्री प्रयोग करणारेही भरपुर आहेत. पण या विषयावर मराठीत पहिल्यांदाच भव्य चित्रपट तयार झाला आहे. प्रसिद्ध ज्योतिषी आनंद पिंपळकर यांनी वृत्तपत्र, टिव्ही, रेडिओ, एफएम या माध्यमातुन आत्तापर्यंत लोकांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या ‘आनंदी वास्तु’ या लाईव्ह कार्यक्रमाचे आत्तापर्यंत 800 भाग प्रसारित झाले आहेत. 68 पुस्तकांच्या लिखाणाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या पिंपळकर यांनी नव्याने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं असून या प्रवासात सर्व रसिक मंडळींनी सोबत रहावं, प्रोत्साहन द्यावं असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना संकटाची व्याप्ती कमी झाल्यानंतर जेव्हा चित्रपटगृह उघडतील तेव्हा “आलंय माझ्या राशीला” हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रभरातील लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल.
मराठीतील या आगळ्या-वेगळ्या धाटणीतल्या चित्रपटास हॅलो महाराष्ट्रकडून भरपूर शुभेच्छा..!!

लेखक – विकी पिसाळ
9762511636

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.