हैदराबाद संस्थान व मराठवाडा मुक्तिदिन विशेष| धनंजय सानप
१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या गुलामगिरीतुन स्वतंत्र झाले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र काही संस्थानानांचे पेच निर्माण झाले होते. त्यात प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, जूनागढ़ आणि हैद्राबाद ही संस्थाने होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १ वर्ष १ महीना २ दिवसानंतर हैद्राबाद संस्थान निजामाच्या गुलामीतुन मुक्त झाले व स्वतंत्र भारतात विलीन झाले. हैदराबाद संस्थानामधे त्यावेळी सध्याचे तेलंगाना राज्य, महाराष्ट्रातील संपूर्ण मराठवाडा व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग आणि कर्नाटकातील बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ आणि गुलबर्गा (या भागाला आज हैद्राबाद कर्नाटक म्हणले जाते) या जिल्ह्यांचा समावेश होता. महाराष्ट्रात हैदराबाद मुक्तिसंग्रामाला मराठवाडा मुक्तीसंग्राम असेही म्हणतात. मराठवाड्यातल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात मराठवाड्याच्या मुक्तिसाठी आपलं सर्वस्व पणाला लावले होते.
हैद्राबाद संस्थानचा मुक्तिदिन १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून मराठवाड्यात मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. या लढ्यात मुक्तीसंग्रामासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या आठवणीला उजाळा देत राष्ट्रीय ध्वज गावोगावी फडकवला जातो. हा साधारण आणि किमान महाराष्ट्राला माहित असावा इतका साधा आणि सरळ इतिहास आहे. पण ही अपेक्षा ठेवणं म्हणजे धाडसाचं काम आहे.
मागच्या काही वर्षात मराठवाडा म्हटलं की आठवतो तो दुष्काळ, शिक्षणाचा घसरलेला टक्का, बालविवाह, हुंडाबळी, जातीयवाद, राजकारण तसेच सामाजिकीकरणाची मंदावलेली गती, बेरोजगारीचं वाढतं प्रमाण आणि पुणे मुंबई सारख्या शहरात उपजीविकेचं साधन मिळावं म्हणून
मराठवाड्यातुन स्थलांतरीत होणारे लोंढे. कुशल कामगार नाहीत, आरोग्याचे प्रश्न असंख्य आहेत, शेतीबद्दल वाढत जाणारी उदासिनता, वाढत जाणाऱ्या औद्योगिकीकरणाच्या रेट्यामुळे निर्माण झालेले पर्यावरणाचे प्रश्न. विकास काय असतो? कसा असतो? हे माहीत नसल्याने साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीला भारावून जाणं इथल्या माणसांच्या अंगवळणी पडलेलं आहे.
हा ‘नाही’चा पाढा वाचल्यानंतर मग मराठवाड्यात आहे काय? असा प्रश्न पडणं देखील साहजिक आहे. मराठवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातुर, हिंगोली, नांदेड असे आठ जिल्हे आहेत. या पैकी औरंगाबाद, नांदेड आणि लातुर हे जिल्हे बऱ्यापैकी विकसित आहेत तर परभणी, जालना हे जिल्हे विकसनशील आहेत. बीड, उस्मानाबाद आणि हिंगोलीचं चित्र मात्र समाधानकारक नाहीये.
राजकीय क्षेत्रात राष्ट्रीयस्तरावर मराठवाड्याचं नाव घेऊन जाणारे शिवराज पाटील-चाकूरकर, शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, पद्मसिंह पाटील असे नेते इथे निर्माण झाले. मात्र राजकीय स्वार्थासाठी विकास या संकल्पनेला मर्यादित स्वरुपात बंदिस्त करून ठेवलं गेलं. घराणेशाहीचा प्रभाव इथल्या राजकारणात प्रभावी आणि परिणामकारक ठरलेला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात मोठं योगदान मराठवाडी लेखक साहित्यिकाचं आहे. दलित साहित्यात देखील मराठवाड्यातील साहित्यिकांचा मोलाचा वाटा आहे.
कला, खेळ, संगीत, नाटक, चित्रपट यामध्ये नव्याने संधी निर्माण करणारी पिढी पुढे येऊ लागली आहे. औरंगाबाद हे मराठवाड्यातलं मोठं आणि झपाट्याने वाढणारं शहर आहे. मराठवाड्यातल्या सांस्कृतिक, सामाजिक चळवळीचं केंद्र असलेले औरंगाबाद शहर वेरूळ-अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांमुळे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जात आहे. संत परंपरा आणि प्राचीन लेणी यांचा वारसा या भूमित आहे. वैचारिक वारसा जपणारी मोठी मंडळी इथल्या भूमित जन्मली.
मराठवाड्यातल्या बोलीभाषा या प्रमाणभाषेच्या जवळ जाणाऱ्या आहेत. आणि त्यात पण जिल्ह्यानुसार बोलींचे वैविध्य आहे. खाद्यसंस्कृतीवर निजामाचा प्रभाव दिसतो तोच प्रभाव रहाणीमानावरही दिसून येतो. मराठवाड्यातील माणसं नवाबी शैलीत जगताना दिसतील. आणि याच्या उलट धावपळ न करता मिळेल त्यात समाधान शोधणारा माणूसही इथे भेटेल. बोलताना सहज ‘च्या मायला’ म्हणणं आणि रिकामटेकडी हौस लोकांच्या स्वभाववृत्तीत दिसून येते. लोक धार्मिकवृतीचे आहेत संतांची भूमी असल्याने वारकरी संप्रदायाचा मोठा अनुयायी वर्ग या भागात आहे. पंढरपुरच्या पांडुरंगाला दैवत मानणारा हा शेतकरी, कष्टकरी वर्ग इथे मोठ्या प्रमाणात आहे.
इतकी विविधता असून देखील विकासाच्या दृष्टिकोनातुन विचार केला तर मात्र विकासाच्या बाबतीत मराठवाडा महाराष्ट्रातील इतर प्रदेशापेक्षा खुप मागे असल्याचं दिसतं. याला जबाबदार जसे इथले राजकीय नेते आहेत तशीच लोकंसुद्धा या अवस्थेला जबाबदार आहेत हे नकारता येत नाही.
विकासाचा आलेख प्रगतीच्या दिशेला घेऊन जायचा असेल तर राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभाग याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन येत राहणार आणि आम्ही मात्र एक दिवस साजरा करून पुन्हा दुसऱ्या दिवशी बोंबलत बसणार हे काही राजकीय, सामाजिक, आर्थिक विकासासाठी परिणामकारक ठरणार नाही !
ढोबळमनाने केलेली मांडणी सुद्धा वास्तवाजवळ जाते हे लक्षात घ्या.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन चिरायु होवो..
७० व्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या प्रेमळ सदिच्छा..!
धनंजय सानप
धनंजय..खूप अभ्यासपूर्ण