परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक झाले असून, आज पासून बेमुदत कॉलेज बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी ही धरणे आंदोलनाला बसले असून, आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय, आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका मांडली आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी बुधवार दि ५ फेबुवारी पासुन बेमुदत कॉलेज बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे .परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठतही, याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू आणि प्रशासकीय कार्यालयासमोर, विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली असून, या आंदोलनामध्ये ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने विद्यापीठातील वस्तीगृह शुल्क कमी करण्यात यावे, कृषी पदवीला व्यवसायिक दर्जा घोषित करावा. परीक्षेनंतर ४५ दिवसांमध्ये निकाल लावण्याची जबाबदारी पार पाडावी. तसेच २०१९ साली विद्यापिठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वस्तीगृह उपलब्ध करून द्यावे या मागण्याचा समावेश आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटून विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. विद्यापीठाकडून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या पाच तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला होता. “निवेदन , लाक्षणिक धरणे आंदोलन करूनही मागण्या मान्य होत नसल्याने, राज्यातील इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह आता वनामकृवितील विद्यार्थीही मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन आता करणार आहेत,” असे विद्यार्थी प्रतिनिधीनीं यावेळी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.