Saturday, June 3, 2023

मराठवाडा गारठला ! काही जिल्ह्यांचा पारा 10 अंशांवर

औरंगाबाद – मराठवाड्यात मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसभर आता थंडी जाणवत असल्यामुळे बालके व नागरिक दिवसाही उद्धार कपडे घालून घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी परभणीत सर्वात कमी 10.6 सेल्सिअस तापमान असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात करण्यात आली, तर लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी परिसरात 10 अंश सेल्सिअस तापमान होते. कडाक्याची थंडी पडत असल्याने दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीत सुरुवात झाली होती. परंतु, त्यानंतर वातावरणात बदल झाल्याने ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. मराठवाड्यात मागील तीन ते चार दिवसांपासून उत्तरेकडून थंड गार वारे वाहत असल्यामुळे तापमानात घट झाल्याने कडाक्याची थंडी पडू लागली आहे. 16 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या किमान तापमानात घसरण झाली असून 11.7 नोंद करण्यात आली, तर 17 डिसेंबर रोजी किमान 11 अंश, 18 डिसेंबर रोजी किमान 10 अंशाच्या नंतर, 19 डिसेंबर रोजी किमान 10.6 अंशांवर ची नोंद करण्यात आली आहे. तापमानात दिवसेंदिवस घट होत असून, कडाक्याची थंडी पडत आहे. ही थंडी रब्बी हंगामातील गहू हरभरा या पिकास पोषक असल्याचे मानले जात आहे.

जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या –
मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढल्याने शहरासह ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. सकाळी व सायंकाळी पासून शेकोट्या पेटवून नावे थंडीपासून आपले संरक्षण करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे उबदार कपड्यांची मागणी देखील वाढली आहे.