Sunday, June 4, 2023

मराठवाडा हादरला ! एकाच दिवशी चार खून

औरंगाबाद – काल दिवसभरात चार खुनांच्या घटनांनी मराठवाडा हादरून गेला. नालीत कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावरून नांदेडमधील दोन सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला तर बंदाघाट भागात महिलेचा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची घटना घडली. तिसऱ्या घटनेत कळंब तालुक्यात पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करुन तीची हत्त्या केली. एकाच दिवशी झालेल्या चार खुनांच्या घटनांमुळे मराठवाड्यात कायद्याचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहिल्या घटनेत नालीत कचरा टाकण्याच्या शुल्लक कारणावरून वाद घालत धारदार शस्त्राने प्रफुल दिगंबर राजभोग (35), संतोष दिगंबर राजभोग (33) या दोन सख्ख्या भावांचा अमानुष खून करण्यात आल्याची घटना नांदेड शहरातील देगावचाळ भागात घडली. या प्रकरणी वजीराबाद पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दुसरी घटना नांदेड शहरातील बंदा घाट भागात घडली. या भागात एका महिलेचा निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची घटना उघडकीस आली. 25 ते 30 वर्षे वय असलेल्या एका अनोळखी महिलेचे मान आवळून दोन्ही हात, पोटापासूनचा भाग कापून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि पुरावे नष्ट करण्याचा हेतूने तिला नदीपात्रात फेकून देण्यात आले. या प्रकरणी वजीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत कळंब तालुक्यातील रांजणी येथे अज्ञात कारणाने पतीने आपल्या 55 वर्षीय पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिला ठार मारल्याची घटना उघडकीस आली. मंगल विठ्ठल संगापुरे असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती विठ्ठल संगापुरे याला पोलिसांनी अटक केली आहे.