Saturday, March 25, 2023

थकीत ऊस बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

- Advertisement -

सांगली । तासगाव व नागेवाडी साखर कारखान्यांची 17 कोटी रुपयांची थकीत ऊसबिले मिळावीत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी तहसीलदार कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढला. थकीत बिलांचे धनादेश घेतल्याशिवाय तहसील कार्यालयाच्या दारातून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांना घेतल्याने खासदार संजयकाका पाटील यांनी नरमाईची भूमिका घेत साखर कारखाना प्रशासनास 15 जानेवारीचे धनादेश देण्याचे आदेश दिले. यानंतर तब्बल पाच तास चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनामुळे तासगाव आणि नागेवाडी साखर कारखान्यांनी आतापर्यंत 30 कोटी रुपयांची बिले दिली. परंतु तासगाव कारखान्याची 13 आणि नागेवाडी कारखान्याची चार कोटी रुपये बिले अद्याप थकीत आहेत. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कारखाना प्रशासनाबरोबर चार डिसेंबरला तहसीलदारांच्या दालनात एक बैठक झाली होती. बैठकीत 22 डिसेंबरपर्यंत ऊसबिले अदा करण्याचे आश्वासन दिले होते. पण शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत. त्यामुळे मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -

सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मोर्चाची सुरुवात करण्यात आली. साडेअकरा वाजता मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या दारात आला. स्वाभिमानीचे महेश खराडे, दामाजी डुबल, जोतीराम जाधव यांसह पदाधिकाऱ्यांसह तब्बल 700 ते 800 शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मारला. त्यानंतर खासदार संजय पाटील यांनी मोबाईलवरुन शेतकऱ्यांशी संवाद साधून पंधरा दिवसांत सर्व थकीत बिले देण्याची ग्वाही दिली यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.