पुणे | भौतिक जगातील अवकाश हा वास्तूरचनाकाराला काही सुचवत असतो. या अवकाशात वास्तूरूपात बांधून काढलेला अवकाश व रिकामा अवकाश यांचे एकमेकांशी असणारे नाते समजावून घेत त्याचा उत्सवच साजरा करायचा असतो. शेवटी हे जग माणसाबरोबर पशू-पक्षी, कीटक, व वनस्पतींसाठी आहे याचे भान ठेवायला हवे, असे प्रतिपादन बांगला देशातील प्रसिद्ध महिला आर्किटेक्ट मरिना तबस्सूम यांनी मांडले. निमित्त होते ते महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बीएनसीए) आणि रोहन बिल्डर्स यांच्या सहकार्यातून अद्वैत बडवे स्मृती व्याख्यानाचे व द ड्रॅाईंग बोर्ड स्पर्धेचे.
महर्षी स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील आर्किटेक्ट अद्वैत बडवे स्मृती व्याख्यानमालेतील १७ वे पुष्प त्यांनी गुंफले. यावेळी बडवे कुटुंबियांपैकी प्रसिद्ध वास्तूरचनाकार व्ही.व्ही.बडवे,त्यांच्या पत्नी वृंदा बडवे आणि सत्यजीत बडवे बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, शिक्षण विभाग प्रमुख डॉ. शुभदा कमलापूरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
एखाद्या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना मानसिक पातळीवर आपल्याला मला काय वाटते तसेच तेथे वावरताना आपल्या मनात काय विचार येतील याचे भान आपण त्याचा आराखडा तयार करताना ठेवत असतो, असा अनुभव प्रतिष्ठेचा आगाखान पुरस्कार विजेत्या तबस्सूम यांनी सांगितला. बांगला देशातील ढाका येथील स्वातंत्र्य स्मृतीस्तंभ, मशिद आणि पर्यटकांसाठी निवासाच्या त्यांनी केलेल्या प्रकल्पांचे दाखले त्यांनी दिले.
बांगला देश विद्यापीठातून आर्किटेक्चरची पदवी घेतलेल्या तबस्सूम म्हणाल्या की, बांगला देशातील जीवनशैली व लोकजीवन, निसर्ग यांचा विचार वास्तूरचनेत करावा लागतो. ढाका येथील प्रतिष्ठेच्या स्वातंत्र्य स्मारकाच्या कामात आपण मानवी भावभावनांचा विचार वास्तूरूपात मांडला. त्यानुसार पृष्ठभागावर उत्तुंग व प्रकाशमान स्तंभ तुमच्या आनंद, आकांक्षाचे प्रतिक, तर जमिनीखाली दु:खद पण प्रेरणादायी इतिहास दाखवणार्या संग्रहालयाची भावस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात नैसर्गिक प्रकाश व अवकाश यांचा समतोल राहील, हा प्रयत्नही केला. तीच गोष्ट इतर निवासी प्रकल्पांमध्ये केली. आपल्या प्रत्येक प्रकल्पात तिथे वावरणारे मानवी मन त्या अवकाशात जास्तीत जास्त कसे गुंतेल हाच आपण कटाक्ष ठेवला, असे तबस्सूम यांनी स्पष्ट केले.
यावेळी स्पर्धेचे परिक्षक व बंगलोर येथील आर्किटेक्ट पी. एन. मेडप्पा आणि आर्किटेक्ट सुमित्रो घोष यांनीही आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. सुरूवातीला डॉ. कमलापूरकर यांनी 25 व्या वर्षात पदार्पण करणार्या बीएनसीएच्या वाटचालीची माहिती दिली. त्यांनी रोहन बिल्डर्स व माईंड स्पेस संस्थेचे संजय मोहे यांनी विद्यार्थ्यांमधील संवेदनशीलतेला आवाहन करणार्या द ड्रॅाईंग बोर्ड स्पर्धेमागच्या संकल्पनेचे स्वागत केले. व्ही.व्ही.बडवे यांनी सादरीकरण करणार्या वक्त्यांचे स्वागत केले. रोहन बिल्डर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक सुहास लुंकड म्हणाले की. प्रत्येक बांधकामाच्या रचनेतून आपण समाज घडवत असतो. त्यामुळे ही महत्वाची जबाबदारी पर्यायाने वास्तूरचनाकारांवर येत असते. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांमधून ही जाणीव भविष्यात अधिक प्रगल्भतेने व्यक्त व्हावी असा आमचा हेतू आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा.प्राजक्ता कुलकर्णी, प्रा.अमृता बर्वे तसेच प्रा.महेश बांगड यांनी केले होते. विप्रा कोठारी यांनी सूत्रसंचालन केले, तर अभिषेक भटेवरा यांनी आभार मानले.




