मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा बिगूल एप्रिलनंतर वाजणार : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सध्या विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका सुरू असून काही सोसायटीच्या निवडणुका बाकी आहेत. विकास सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया संपताच कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल एप्रिल महिन्यानंतर शेवटच्या आठवड्यात वाजणार असल्याचे सूतोवाच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.

https://fb.watch/bRBJWRE48Q/

कराड येथे सहकारमंत्री श्री. पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात विशेषःत कराड तालुक्यात एकमेकांच्याविरूध्द इर्षा आलेली आहे. लोकांच्या लक्षात आले आहे, की मार्केट कमिटीच्या माध्यमातून परिसरातील लोकांचा विकास होवू शकतो. शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो आणि जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या राबविता येतात.

राज्यात मार्केट कमिटीच्या निवडणुकीचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याने आता राजकारण स्थानिक पातळीवर तापलेले पहायला मिळणार आहे. कराड तालुका विकास सेवा सोसायटी गटातून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे जिल्हा बॅंकेवर निवडूण गेलेले आहेत. तर सध्या मार्केट कमिटी अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्याकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत लढत ही या दोन गटामध्ये होणार हे सध्यातरी निश्चित मानले जात आहे. अशात भाजप नेते डाॅ. अतुल भोसले यांच्या गटाची काय भूमिका याकडेही तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे.