बाजारपेठेने दसऱ्याच्या दिवशी लुटले ‘सोने’ ! मार्केटमध्ये तब्बल 300 कोटींची उलाढाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या सणाला शुक्रवारी शहर व जिल्ह्यात रिअल इस्टेट, वाहन बाजार, सोने-चांदी आणि इलेक्टॉनिक्स मार्केटमध्ये जवळपास तीनशे कोटींची उलाढाल झाली. याच मुहूर्तावर साडेतीनशे चारचाकी, दीड हजार दुचाकींची विक्री आणि दोनशे घरांची बुकिंग झाल्याची माहिती ‘क्रेडाई’चे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी दिली. या उलाढालीने बाजारपेठेने दसऱ्याचे अक्षरशः सोनेच लुटले!गणेशोत्सवापासून बाजारपेठेत तेजी पाहायला मिळाली. गणेशोत्सवापासून आतापर्यंत पाचशे घरांची बुकिंग झाली होती. आजही दोनशे घरांची बुकिंग झाली. आठवड्यापासून बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गेल्या दीड वर्षांनंतर दसरा सण सर्वांनी उत्साहात साजरा केला. मोठ्या उलाढालीमुळे बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले. कपडा मार्केटमध्येही रेलचेल दिसून आली.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. ग्राहकांसाठी समाधानाची बाब म्हणजे गुरुवारच्या तुलनेत सोने-चांदी 200 ते 300 रुपयांनी स्वस्त झाल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी काहीसे समाधान व्यक्त केले. यामुळे दसऱ्याच्या दिवशी ग्राहकांनी खरेदीसाठी सराफा दुकानात मोठी गर्दी केली होती. अतिवृष्टीचा परिणाम जाणवला, मात्र यातही बुकिंगसह विविध दागिणे खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली होती.

ऑटोमोबाईल जोमात – 

ऑटोमोबाईल क्षेत्राने काही महिन्यांपासून उसळी घेतली आहे. यंदाचा दसरा ऑटोमोबाईलसाठी बंपर ठरला. आज साडेतीनशे चारचाकी आणि जवळपास दीड हजार दुचाकींची विक्री झाली. यात ग्रामीण भागातील अपवाद सोडल्यास वाहन बाजारपेठ जोमात होती. नामांकित चारचाकीच्या वाहनांची तर पाच ते सहा महिन्यांची वेटिंग आहे. दरवर्षी यातून कोट्यवधींची उलाढाल असते. चार ते पाच महिन्यांपूर्वी बुकिंग केलेल्यांना आज वाहन मिळाले.इलेक्ट्रॉनिक्स मार्केट अतिवृष्टीमुळे यंदा अनेक घरात पाणी शिरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे नुकसान झाले. यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर होम अँड किचन अप्लायन्सेस मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

घरखरेदी वाढली – 

दिवाळीनंतर घरांच्या किमती वाढणार असल्याने अनेकांनी दसऱ्यापूर्वीच घराचा शोध सुरू केला. दसऱ्याच्या मुहूर्तावर 200 जणांनी घरांची बुकिंग केली. तर अडीचशेहून अधिक जणांनी गृहप्रवेश केला, अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बगडिया यांनी दिली.

Leave a Comment