औरंगाबाद | घरात जास्त सदस्य असल्याने मला काम होत नाही. म्हणूनच आता खटल्याच्या घरात नांदायचे नाही. हे नवरा ऐकत नाही म्हणून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना सोमवारी सकाळी 8 वाजे दरम्यान घडली आहे. विवाहितेने पतीशी काहीही काहीही संबंध नाही अशी चिट्टी लिहून आत्महत्या केली आहे.
वाळूज येथील साई कॉलनी येथे राहणाऱ्या पपिता राहुल वानखेडे (वय 24) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती कुटुंबीयापासून वेगळे राहत नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे. यामध्ये पतीचा काहीही संबंध नाही अशी चिठ्ठी लिहून तिने आत्महत्या केली आहे.
सोमवारी सकाळी चार वाजता तिने सासरा, दिर, पतीला डब्बा करून दिला. सासू आणि नणंद दहा महिन्यांच्या मुलीला झोपी घालत होत्या. बराच वेळ झाल्याने पपिताचा प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता पपिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यावेळी त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरख चव्हाण आणि मनीषा केदार करत आहे.
आमची मुलीने आत्महत्या केली नाही – नातेवाईक
लग्न झाल्यापासून आमच्या मुलीला त्रास होता तसेच तिचा पती तिच्यावर नियमित संशय घेत होता. आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही. तसे तिच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीत लिहिलेला मजकूर आणि तिचा हस्ताक्षर वेगळा असल्याचा वृद्ध महिलेचा भाऊ प्रवीण इंगळे यांनी सांगितले.