सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले जवान रोमित तानाजी चव्हाण यांच्यावर शिगाव तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी आबालवृद्धांना अश्रू अनावर झाले. रोमितच्या मित्रांनी एकच टाहो फोडला. आपल्या जवान मित्राला साश्रु नयनांनी आखरेचा निरोप दिला. तत्पूर्वी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान रोमितचे पार्थिव शिगाव येथे त्याच्या घरी दाखल होताच गावच्या सुपत्राचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. आई, वडील, बहीण, नातेवाईक, मित्र, गावकरी यांनी रोमितचे पार्थिव पाहताच एकच टाहो फोडला.
काश्मीरमधील सोफिया भागात एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करताना शनिवारी सकाळी रोमित चव्हाण यांच्यासह आणखी एक जवान शहीद झाला होता. रोहित चव्हाण यांना गोळी लागल्याचे समजताच सांगली जिल्ह्यातील शिगाव गावावर शोककळा पसरली होती. रोमित हा तानाजी चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच सैन्यदलाचे आकर्षण असल्यामुळे वयाच्या १९ व्या वर्षीच तो सैन्यदलात भरती झाला होता. गेल्या वर्षभरापासून तो काश्मीरमध्ये सेवा बजावत होता. दोन महिन्यांपूर्वीच सुट्टीहून परत गेल्यानंतर त्याचे काश्मीरमधील सोफियाँ भागात पोस्टिंग झाले होते. तीन मार्चला त्याचा वाढदिवस असल्याने तो पुन्हा सुट्टीवर येणार होता. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रोमित चव्हाण यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले.
रोमितच्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. संपूर्ण मार्गावर रांगोळी काढून फुले अंथरण्यात आली होती. यावेळी अमर रहे, अमर रहे रोमित चव्हाण अमर रहे, वीर जवान तुझे सलाम आशा भावपूर्ण घोषणा देण्यात आल्या. ग्रामपंचायत मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ येथे त्याचे पार्थिव लोक दर्शनासाठी ठेवण्यात आले. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ येथून महादेव मंदिर मार्गे शिवतेज चौक ते वारणा नदी काठी हे पार्थिव आणण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, जवान यांनी पुष्पचक्र अर्पण केले. कष्ट, जिद्द, चिकाटीच्या जोरावर अवघ्या 18 व्या वर्षी सैन्यात दाखल झालेल्या रोहितला पाच वर्षे सेवा बजावीत वयाच्या 23 व्या वर्षी वीरमरण आले. गावात तीन दिवस दुखवटा पाळण्यात आला. यावेळी राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच लष्करातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी श्रध्दांजली वाहिली.
जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, तहसीलदार प्रदीप उबाळे, प्रांत, राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन पी.आर.पाटील, जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, सरपंच निवास गावडे, सांगली व कोल्हापूर जिल्हा माजी सैनिक, कर्नल प्रदीप ढोले, वडील तानाजी चव्हाण, 4 महार रेजिमेंट सुभेदार कांबळे, स्टेशन कमांडर कोल्हापूर, चीफ ऑफ आर्मी स्टाफ वतीने कर्नल नागेश यांनी पुष्पचक्र वाहिले. लष्कर व पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडण्यात आल्या. रोमित यांचा जन्म 3 मार्च 1999 रोजी शिगाव येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला. वडील राजाराम बापू पाटील कारखाना येथे नोकरीस आहेत. आई गृहिणी असून बहीण शिक्षण घेत आहे. रोमितचे प्राथमिक शिक्षण शिगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालय येथे झाले तर बारावी पर्यंतचे शिक्षण बळवंतराव यादव महाविद्यालय पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर येथे झाले. कला शाखेतून बारावी झालेनंतर ते 2017 साली मुंबई येथे सैन्यदलात भरती झाले होते.