सातारा | शहीद जवान विपुल इंगवले यांच्या पार्थिवावर आज भोसे (ता. कोरेगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. शहीद विपुल इंगले यांचे बंधू विशाल यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी शहीद जवान विपुल इंगले यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे सुपुत्र विपुल इंगवले यांचे पार्थिव साताऱ्यात दाखल झाले आहे. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांचा जनसागर लोटला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी दोन विवाहित बहिणी आणि भाऊ असा परिवार आहे.
विपुल इंगवले यांचा जीवनक्रम
विपुल इंगवले हे सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी गावातच माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. या काळात उत्कृष्ट बॉक्सर म्हणून ते पुढे आले. एन. सी. सी. कॅडेट म्हणून त्यांनी उठावदार कामगिरी केली होती. गतवर्षी सियाचीन मध्ये कर्तव्य बजावत असताना बर्फवृष्टीत ते सापडले होते. गेल्या वर्षभरापासून काही काळ दिल्लीत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुण्यात उपचार सुरू असताना दोन दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले.