आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक साहित्य आ. शशिकांत शिंदे देणार आमदार फंडातून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरेगांव येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्‍यातील सर्व सात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी आवश्‍यक असलेले साहित्य आमदार फंडातून उपलब्ध करून देणार आहे. परिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले असल्याने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना शासकीय कोरोना केअर सेंटर्समध्ये सेवा देण्यासंदर्भातील आदेश प्रांताधिकाऱ्यांनी आजच काढावेत आणि कोरेगावमधील खासगी रुग्णालयातील बेड्‌स अधिग्रहण करावेत. याकामी काही अडचण आल्यास संबंधितांशी मी स्वत: चर्चा करेन. मात्र, एकही रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आरोग्य विभागासह प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे केली.

पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती सुनील साळुंखे, माजी सभापती संजय झंवर, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, सहायक गटविकास अधिकारी सुनील भस्मे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. राजन काळोखे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कोरोनासह आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणीही राजकारण करता कामा नये, असे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, “”रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे उपाययोजना राबवण्यासाठी ग्रामसमित्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घ्यावे. उपजिल्हा रुग्णालय परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आरटीपीसीआर व रॅट टेस्ट करण्याची व्यवस्था करावी. कोरेगाव येथील चॅलेंज ऍकॅडमी येथे शंभर बेड व ग्रामीण रुग्णालयामध्ये 99 ऑक्‍सिजन बेड लवकरच सुरू केले जाणार आहेत.

नगरपंचायत स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू करणार

कोरेगाव शहरातील रुग्णसंख्येचा चढता आलेख लक्षात घेऊन नगरपंचायतीकडे निधीची तरतूद असल्यास शहरासाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर सुरू करावे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील विविध घटकांचे निश्‍चितपणे सहकार्य मिळेल, असे आमदार शिंदे यांनी या वेळी सुचवले. त्यावर मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी चौदाव्या वित्त आयोगातून दहा लाखांपर्यंतचा निधी कोरोनासाठी वापरता येऊ शकेल, त्यावरील खर्चासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले आणि नगरपंचायतीमार्फत निश्‍चितपणे स्वतंत्र कोरोना केअर सेंटर सुरू केले जाईल, असेही मुख्याधिकारी घाडगे यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment