हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात एकीकडे कोरोना परिस्थितीशी जनता लढा देत असताना दुसरीकडे राजकीय उलथापालथी देखील मोठ्या प्रमाणात राज्यात घडताना दिसत आहेत. भाजपच्या विद्यमान सात आणि तीन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले या राजकीय घडामोडीला 24 तास देखील उलटले नाहीत तोपर्यंत भाजपने देखील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. माथेरानमध्ये शिवसेनेच्या 14 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापूर येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. यात उपनगराध्यक्ष यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ही समावेश आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपाच्या विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवत माथेरान नगरपरिषदेतील १४ पैकी १० नगरसेवकांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! @JPNadda @dev_fadnavis pic.twitter.com/p30U5aGIjQ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 27, 2021
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकाच वेळी दहा नगरसेवकांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे माथेरानमधील सत्ता चित्रच बदलले आहे. कोल्हापूरमध्ये हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर देखील भूमिका मांडली आहे.
ज्या नगरसेवकांनी शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे त्यामध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष), राकेश चौधरी (नगरसेवक), सोनम दाबेकर (नगरसेवक), प्रतिभा घावरे (नगरसेवक), सुषमा जाधव (नगरसेवक), प्रियांका कदम (नगरसेवक), ज्योती सोनवळे (नगरसेवक), संदीप कदम (नगरसेवक), चंद्रकांत जाधव (नगरसेवक), रुपाली आखाडे (नगरसेवक) यांचा समावेश आहे.