कराडात मटकाकिंगमुळे गुन्हेगारी फोफावतेय, पोलिस कारवाई करणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात मटका खुलेआम चालू असून त्यांची पाळेमुळे ही कराड व मलकापूर शहरात रूजली असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत मटकाकिंग यांच्यामुळे शहरातील वातावरण दूषित झाले असून गुन्हेगारी फोफावू लागली आहे. या प्रकारामुळे वर्चस्ववाद समोर येत असून खूनाच्या घटनाही घडलेल्या आहेत. तेव्हा पोलिसांनी या व्यवसायाची पाळेमुळे शोधून मटकाकिंगच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून मटका तेजीत असून त्यावर अकुंश ठेवणे गरजेचे आहे. शहरात झालेल्या खूनप्रकरणात अनेक मटका व्यवसायाशी लागेबांधे असलेचे बोलले जात आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या खून प्रकरणात शहरातील प्रमुख मटका व्यावसायिकाला अटक झाली. तरीही त्याच्या पश्चात हा व्यवसाय जोरात सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवैध असणारा मटका व्यवसाय दिवसेंनदिवस फोफावत असून त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले दिसत आहे. अशावेळी या अवैध व्यवसायातून अनेक तरूण तसेच लोकांचे संसार उध्दवस्त होत असून गुन्हेगारीकडे तरूण वळत आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा काळा इतिहास घडल्यास दोष कुणाला द्यायचा. तेव्हा पोलिसांनी लवकरात लवकर या मटका व्यवसायाची पाळेमुळे शोधून वचक बसविणे गरजेचे आहे.

शहरासह ग्रामीण भागात मटका व्यवसाय करणार्‍यांची सुमारे 150 च्या आसपास टपर्‍या आहेत. युवक वर्ग कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या नादात या चुकीच्या वाटेला जात आहे. तेव्हा या लोकांच्यावर तसेच व्यवसायावर पोलिसांनी लक्ष देवून मटका शहरातूनच नव्हे तर तालुक्यातूनही हद्दपार करण्याची मागणी सामान्य नागरिकांच्यातून केली जात आहे. अन्यथा शहराला चालू वर्षात लागलेला काळा डाग पुसण्याऐवजी या मटका व्यवसायातून आणखीन गडद होईल, तेव्हा या व्यवसायातील मोरक्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळणे शहराच्या शांततेसाठी गरजेचे बनले आहे.