युद्ध म्हणजे जणू राजकारणाचाच भाग आहे असे वाटत आहे – मेधा पाटकर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेले दीड महिने भारत-चीन सीमेवर तणाव सुरु आहे. सोमवारी सायंकाळी दोन्ही देशातील सैनिकांच्यामध्ये झालेल्या चकमकीत भारतातील २० जवान मृत्युमुखी पडले आहेत तर ४३ जवान जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. सीमेवर हे तणाव सुरु असतानादेखील चीनी कंपन्यांसोबत करार केल्याचे समोर आले आहे. चीनचे पंतप्रधानही भारतात येऊन गेले आहेत. अशावेळी ‘एकीकडे चीनचे पंतप्रधान भारतात येतात आणि साबरमती आश्रमात झोपाळ्यांवर झुले घेतात. चिनी वस्तुंवर बहिष्कार घालण्याची भाषाही आपण करतो. परंतू, त्यांच्याबरोबर झालेले करार तसेच सुरू ठेवतो. तिसरीकडे त्यांच्या सीमेवर युध्दाची तयारीही करतो. आता युध्द म्हणजे दुर्दैवाने राजकारणाचा भाग झाल्यासारखे वाटते आहे’ असे परखड मत ज्येष्ठ पर्यावरणवादी तसेच सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले आहे.

सोलापुर येथे झालेल्या  सोलापूर श्रमिक पत्रकार संघात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.  मेधा पाटकर म्हणाल्या,  “एकीकडे चीनच्या मुद्यावर आपण राष्ट्रभक्ती दाखविण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत झालेले करार तसेच ठेवतो हे सर्व परस्पर विसंगत आहे.”  दोन राष्ट्रांमध्ये राजकीय, भौगोलिक मुद्यांवर जरूर चर्चा व्हावी, वाटाघाटी व्हाव्यात, परंतt त्यातून आपला देश सुरक्षित राखला जावा. आपले जवानही शहीद होणार नाहीत आणि देशही वाईट परिणाम भोगणार नाही, याची दक्षता घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. सध्या सीमेवरचा तणाव शिगेला पोहोचला असून काहीही होण्याची शक्यता दिसून येते आहे.

दरम्यान इतरही विषयांवर त्यांनी मत व्यक्त केले. परप्रांतीय मजुरांना घरी पाठविण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वे देण्याच्या मुद्द्यावरून फार मोठे राजकारण केल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेची वाट बघून शेवटी विविध राज्यातील मजूर पायी आपल्या घरी जाण्यासाठी निघाले त्यावेळची स्थिती खूप अस्वस्थ करून गेली असेही त्यांनी सांगितले. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत आरोपही केले. संचारबंदीच्या काळात केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारशी खूप वाईट वागल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Comment