दहिवडी | मायणी येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल या वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) कमी गुण असणाऱ्यांना पैसे घेऊन आणि बनावट गुणपत्रक तयार करुन बीएएमएस अभ्यासक्रमाला प्रवेश (Admission) दिले असल्याच्या तक्रारीची सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. सदर प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या (Fake Document) आधारे प्रवेश दिल्याचे निष्पन्न झाल्याने वडूज पोलीस ठाण्यात मनोज सुरेश कांबळे (रा. फलटण) यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत वडूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 2008 साली एका विद्यार्थ्याला 12 वी परिक्षेत 49.50 टक्के, तर दुसऱ्याला 50.17 टक्के गुण मिळाले होते. दोघांनाही बीएएमएस पदवीसाठी पीसीबी गृपमध्ये लागणारे 50 टक्केपेक्षा अधिक गुण मिळाले नव्हते. मायणी मेडिकल कॉलेजमध्ये आर्थिक व्यवहार करुन सेंट्रल बोर्ड ऑफ हायर एज्युकेशन नवी दिल्ली येथील 12 वीची परीक्षा 52 आणि 54 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रके या विद्यार्थ्यांना मिळवून दिली. तसेच शाळा सोडल्याचे बनावट दाखले जोडून त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला, असे तक्रारीत म्हटले आहे.
त्याबरोबरच 2006 सालीही एका विद्यार्थ्याला 12 वी परिक्षेत कमी गुण मिळाले होते. त्याच्याही गुणांचा आणि शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार करुन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता. 2010 मध्ये एका विद्यार्थीनीलाही कमी गुण असताना 61 टक्के गुण मिळाल्याचे गुणपत्रक आणि अस्तित्वात नसलेल्या एका कॉलेजचा शाळा सोडल्याचा दाखला तयार करुन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला होता.
या सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रे विद्यापीठाकडेही पाठविण्यात आली होती. हे सर्व प्रवेश देतेवेळी मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. 18 मे 2021 रोजी याविषयी मनोज कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करुन बनावट दाखले देऊन बीएएमएस करिता प्रवेश घेतल्याचे निष्पन्न झाले असल्याचे कांबळे यांना लेखी कळविले आहे. त्यानंतर 4 एप्रिल 2022 रोजी कांबळे यांनी वडूज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.