रविवारी म्हणजेच २७ एप्रिल २०२५ रोजी मुंबईकरांना रेल्वे प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आवश्यक देखभाल व पायाभूत सुधारणा कामांसाठी हार्बर आणि मध्य मार्गांवर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
हार्बर मार्गावर मोठा ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते वांद्रे/गोरेगाव तसेच CSMT ते वाशी/पनवेल या मार्गांवरील लोकल सेवांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे.
- अप मार्ग (पनवेल/वांद्रे → CSMT): सकाळी ९.५३ ते १७.१३ दरम्यानच्या गाड्या रद्द
- डाऊन मार्ग (CSMT → पनवेल/वांद्रे): सकाळी १०.४८ ते १६.४७ दरम्यानच्या गाड्या रद्द
ब्लॉक दरम्यान कुर्ला ते पनवेल दरम्यान २० मिनिटांच्या वारंवारतेने विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.याशिवाय, प्रवाशांच्या सोयीसाठी या वेळेत मुख्य रेल्वे मार्ग व पश्चिम रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवरही अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक
विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गावर सकाळी ८.०० ते १२.३० या वेळेत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.या कालावधीत काही डाऊन व अप एक्सप्रेस गाड्या (उदा. 11055, 11061, 16345, 12124, 12140, इ.) वळवण्यात येणार असून, त्यांना १०-१५ मिनिटांचा उशीरहोण्याची शक्यता आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ही कामं पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पर्यायी प्रवासाची योजना आखावी आणि सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.तुमचा प्रवास या ब्लॉकच्या वेळेत येत असेल, तर कृपया योजनेत बदल करा आणि वेळेआधी स्टेशनवर पोहोचा.