हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 28 मे जागतिक मासिक पाळी दिवस. या विषयावर मी अनेक जणांशी चर्चा करते मात्र पहिल्यांदाच असं लिहितेय. ‘मासिक पाळी’ असा शब्द उच्चारला तरी अनेकांना लाजल्यासारखं वाटतं किंवा अनकम्फर्टेबल वाटतं. पण खरंच ही इतकी वाईट किंवा विचित्र गोष्ट आहे का हो? मग यावर लोक मोकळेपणाने बोलायला आजही तयार होत नाहीत याची खंत वाटते.
मेडिकलमध्ये सॅनिटरी पॅड आणायला गेलं की अनेक वेगवेगळे अनुभव येतात. ‘विस्पर द्या’ असं म्हटलं की शेजारी उभे असलेली लोकं वेड्यासारखे पाहतात. मग तो पुरुष असो किंवा एखादी स्त्री असो. त्यांच्या त्या कुत्सितपणे पाहण्यामुळे आपण काही गुन्हा करतोय की काय असा विचार मनात येतो. आणि तो मेडिकलवाला सुद्धा हळूच पेपर मध्ये गुंडाळून लपून ते सॅनिटरी पॅडचं पॅकेट आपल्या हातात देतो.
एखाद्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली, म्हणजे ती “शहाणी झाली” की तो एक संस्कार म्हणून तो सोहळा साजरा केला जातो. मग दुसऱ्यांदा येणारी पाळी मात्र विटाळ असते. तिला बाजूला बसवलं जातं. घरात शिवाशिव करायची नाही असं सांगितलं जातं. चार दिवसाच्या मासिक धर्मानंतर डोक्यावरून अंघोळ केली की ती पुन्हा पवित्र होते (??).
ज्या रक्तापासून तुम्ही आम्ही जन्माला आलोय. ज्या विटाळापासून आपला जन्म झाला तो विटाळ अपवित्र कसा? मग आपण सगळेच अपवित्र का नाही? मासिक धर्म सुरू असताना त्या स्त्रीला आरामाची गरज असते. पूर्वी घरातली, शेताची जास्तीची कामं लागायची या कामांपासून चार दिवस आराम मिळावा म्हणून कदाचित या काळात बाजूला बसण्याची प्रथा रूढ झाली असावी. पण तीच पुढे चालून ‘विटाळ’ ठरली.
आजही घरात सगळेजण टीव्ही बघत बसलेलो असताना सॅनिटरी नॅपकिनची ऍड लागली की भाऊ आणि वडील चॅनेल बदलतात. का नाही बघू शकत आपण सगळे मिळून? तुम्हाला सुद्धा ही गोष्ट माहीत आहेच ना? सुरुवातीच्या काळात मला सॅनिटरी पॅडसाठी पैसे लागत असतील तर ते वडिलांना मोकळेपणाने मागू शकत नव्हते. आईला मागायचं मग आई वडिलांना सांगून मागून घेणार. त्यामुळं कुठेतरी असं वाटतं की ही सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. तेव्हाच कुठे या गोष्टी मोकळेपणाने बोलल्या जातील स्वीकारल्या जातील आणि ही गोष्ट मी माझ्या घरात बदलण्याचा प्रयत्न केला. आता अगदी मोकळेपणाने या विषयावर आमच्या गप्पा रंगतात.
खेड्यापाड्यात तर परिस्थिती खूपच वाईट आहे. मी माझ्या गावी मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये तीन महिने राहिले तेव्हा खूपच विचित्र अनुभव आले. तिथं ‘मासिक पाळी’, ‘पिरियड’, ‘एम.सी’ या गोष्टी मोठ्याने बोलण्याची देखील मुभा नाही. मुलगी आईला ही गोष्ट इशारा करून सांगते किंवा कानात खुसुरफुसुर करून सांगते. इथपर्यंत ठीक. पण पुढे प्रश्न आहे मासिक पाळी दरम्यान पाळल्या जाणाऱ्या स्वच्छतेचा. सॅनिटरी पॅड ऐवजी जुनाट, अस्वच्छ कापड वापरलं जातं. तेही ठीक. पण धुतल्यानंतर ते स्वच्छ उन्हात वाळत न घालता दुसऱ्या एखाद्या कपड्याखाली झाकून वाळत घातलं जातं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच कापड वापरलं जातं. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता आहे. मी जेवढे दिवस तिथं होते तिथल्या शेजारपाजारच्या मुलींना या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काहींना माझ्याकडे असलेले पॅड दिले. मुलींशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की, घरचे म्हणतात दर महिन्याला पॅडसाठी पन्नास रुपये कशाला खर्च करायचे. तेवढ्याच पैशात दुसरं काहीतरी भागतं. त्यापेक्षा त्या मुलींची आई कापड वापरण्याचा सल्ला देते. हे ऐकून खूप विचित्र वाटलं मला. हे चित्र कधी बदलेल माहीत नाही… पण त्याची सुरुवात मात्र झाली पाहिजे… ती मात्र स्वतःपासूनच…
शालेय वयातील मुलांच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण होतात. मग ते कुठेतरी शोधतात. मुलामुलांमध्ये चर्चा रंगतात. कारण घरात कधीतरी आई बोलत असताना त्यांनी ऐकलेलं असतं. मासिक पाळी म्हणजे काय? त्यात महिलांना काय त्रास होतो? हे पवित्र की अपवित्र? अशा विषयांवर मुलींसोबत मुलांशी देखील संवाद झाला पाहिजे. शालेयवयीन मुलींना शाळेत सेक्स एज्युकेशनच्या माध्यमातून काही गोष्टी समजून सांगितल्या जातात. तेव्हा मुलांना देखील या गोष्टींची जाणीव त्याच वयात झाली पाहिजे. तेव्हाच कुठे मासिक पाळीदरम्यान असलेले समज गैरसमज दूर होण्यास मदत होऊ शकते.
– वर्षा वाघजी
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा