एमएच 50 एमएच 11 वाहनांना टोलमध्ये सूट द्यावी, अन्यथा टोलनाका बंद पाडणार : अशोकराव गायकवाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे जिल्ह्यातील टोलनाक्यांवर जिल्ह्यातील स्थानिकांना टोलमध्ये सूट दिली आहे. मग सातारा जिल्ह्यातील स्थानिकांना सूट का नाही? असा सवाल करीत एमएच 50 व एमएच 11 पासिंग असणाऱ्या स्थानिकांच्या वाहनांना टोलमध्ये सूट द्यावी, अन्यथा 9 सप्टेंबर रोजी आनेवाडी टोलनाका बंद पाडणार असल्याचा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी दिला आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होते. यावेळी आप्पासाहेब गायकवाड, अशोक मदने, नीलेश गाडे, युवराज काटरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अशोकराव गायकवाड म्हणाले, एम. एच. 50 व एम. एच. 11 पासिंग असणाऱ्या स्थानिकांना टोलमध्ये सूट द्यावी. महामार्गालगत सेवारस्त्यांना लागूनच गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यामुळेही भविष्यात गॅस लिकेज होऊन अपघाताचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत शासन आणि ठेकेदार प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी घेणार आहेत काय? रस्त्यांबाबत प्रशासन, जिल्हाधिकारी हतबल आहे. त्यांना जागे करण्यासाठीच आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. याबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाने ठेकेदार आणि जनता यांच्यात जनतासभा घ्यावी. त्यातून प्रवाशांच्या व स्थानिकांच्या समस्या समजून निर्णय घ्यावा. मात्र, जिल्हाधिकारी जाणूनबुजून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत.

9 सप्टेंबरला टोलनाक बंद पाडणार

टोलविरोधी आंदोलनाची भाषा जिल्ह्यातील इतर नेते करीत आहेत. मात्र, त्यांनी आंदोलनाची तारीख अद्याप स्पष्ट केली जात नाही. टोलमुक्ती सगळ्यांना हवी आहे. मात्र, पुढे यायला कोणी नाही. ते पुढे आले असते तर त्यांना आम्ही पाठिंबा दिला असता. परंतु, त्यांची तारीख स्पष्ट होत नसल्याने आम्ही पुढाकार घेऊन येत्या 9 सप्टेंबर रोजी आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करून टोलनाका बंद पाडणार आहोत.

Leave a Comment