म्हाडाचा खास उपक्रम!! वृद्धांसाठी वृद्धाश्रम तर महिलांसाठी वसतीगृहे जाणार उभारली

0
4
Mhada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सर्वसामान्य नागरिकांना आपले स्वप्नातले घर देण्यासाठी म्हाडा (Mhada) मदत करत असते. आता म्हाडा समाजाच्या महत्त्वाच्या घटकांसाठी आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. मुंबई आणि कोकण परिसरात वृद्धांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले वृद्धाश्रम तसेच नोकरदार महिलांसाठी वसतीगृह उभारण्यासाठी म्हाडा काम करत आहे. हे नियोजन सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.

वृद्धांसाठी सुरक्षित निवास

मुंबई आणि ठाण्यात पहिल्या टप्प्यात अत्याधुनिक वृद्धाश्रम उभारले जाणार आहेत. अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा आणि ठाण्यातील माजीवाडा येथील विवेकानंद नगर परिसरात हे प्रकल्प प्रस्तावित असून त्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. या वृद्धाश्रमांमध्ये आरोग्य सेवा, आरामदायी निवास, भोजनालय, मनोरंजन सुविधांसह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वृद्धांसाठी सुरक्षित आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. भविष्यात पुणे, नागपूर आणि नाशिकमध्येही असे वृद्धाश्रम उभारण्यात येणार आहेत.

नोकरदार महिलांसाठी वसतीगृहे

मुंबईसह उपनगरांमध्ये नोकरीनिमित्त येणाऱ्या महिलांसाठी म्हाडा विशेष वसतीगृहे उभारणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई उपनगरात १० वसतीगृहे उभारण्याचे उद्दिष्ट असून यासाठी योग्य जागांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय ठाण्यातील माजीवाडा येथे २०० महिलांना राहण्याची सुविधा असलेले एक वसतीगृह प्रस्तावित आहे. सुरक्षित आणि किफायतशीर दरात निवासाची सोय उपलब्ध करून देणे, हा यामागील उद्देश आहे.

ग्रोथ हब प्रकल्पांतर्गत मोठी गृहनिर्मिती

म्हाडाने एमएमआर क्षेत्रात ‘ग्रोथ हब’ प्रकल्प हाती घेतला आहे. यानुसार, येत्या पाच वर्षांत मुंबई, ठाणे, पनवेल आणि रायगड या भागात तब्बल आठ लाख घरे उभारली जातील. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह वृद्ध आणि महिलांसाठीही विशेष गृहनिर्मिती प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे हजारो वृद्धांना सुरक्षित निवास मिळेल आणि नोकरदार महिलांसाठी परवडणाऱ्या आणि सुरक्षित निवासाच्या संधी उपलब्ध होतील.