मुंबई । MHT-CET 2020 परीक्षेसाठी अजूनही अर्ज न केलेल्या विद्यार्थांना महाराष्ट्र राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिलासा दिला आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्याने विद्यार्थी आणि पालकांनी नव्याने नोंदणी करण्याची आणि अपूर्ण अर्ज भरण्याची संधी देण्याची विनंती सीईटी सेलकडे केली होती. याची दखल घेत सीईटी सेलने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची अखेरची संधी दिली असून, विद्यार्थ्यांना १ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी होणारी एमएचटी सीईटीही पुढे ढकलली आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनाकडून होत होती. ज्या विद्यार्थ्यांनी ७ मार्चपर्यंत अपूर्ण अर्ज भरले होते. अशा सहा हजार ४१८ विद्यार्थ्यांना आता अर्ज पूर्ण भरून शुल्क भरण्याची संधी यापूर्वी सीईटी सेलने दिली होती. यासाठी २३ मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
मात्र, या काळात ऑनलाइन शुल्क भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता आणखी मुदत वाढ देण्यात आली आहे. यानुसार २६ मे ते १ जून या कालावधीत विद्यार्थांना अर्ज भरता येईल. अर्ज भरण्याबाबतची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”