हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मेजर लीग क्रिकेट (MLC) च्या पहिल्याच हंगामात न्यूयॉर्क मुंबई इंडियन्सने ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. आजच्या फायनल सामन्यात मुंबईने सिएटल ऑर्कासला ७ विकेटने पराभूत करत ट्रॉफी जिंकली आहे. कर्णधार निकोलस पुरनने धडाकेबाज शतक झळकावत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला आणि नवा इतिहास रचला. या विजयानंतर आयपीएल मध्ये तब्बल ५ वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने अमेरिकेत सुद्धा आपला डंका पेटवला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स जगातील सर्वोत्कृष्ट फ्रॅन्चायजी का आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
एमआय न्यूयॉर्कने नाणेफेक जिंकून सिएटल प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. सिएट ऑर्कासने २० षटकात ९ गडी गमावून १८३ धावा केल्या. यामध्ये विकेटकिपर सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ८७ धावा ठोकल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. डी कॉक व्यतिरिक्त शुभम रांजणे आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी अनुक्रमे 21 आणि 29 धावा बनवल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट आणि राशिद खानने प्रत्येकी ३ बळी घेतले. राशिद खानने टिच्चून गोलंदाजी करत ४ ओव्हर मध्ये अवघ्या ९ धावा दिल्या.
The kind of 𝐌𝐨𝐧𝐝𝐚𝐲 𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐥𝐮𝐞𝐬 we like 🫶😍
Congratulations, @MINYCricket 💙#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/JHTZCBXjEO
— Mumbai Indians (@mipaltan) July 31, 2023
प्रत्युत्तरात, १८४ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर स्टीव्हन टेलर आणि जहांगीर लवकर बाद झाले. परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या कर्णधार निकोलस पूरनने जबाबदारी स्वीकारली आणि सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. पूरनने अवघ्या ५५ चेंडूत १३७ धावांची वादळी खेळी केली. यामध्ये १० चौकार आणि १३ गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे. आपल्या धडाकेबाज खेळीने निकोलस पूरनने मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला आणि मेजर क्रिकेट लीगची पहिलीवहिली ट्रॉफी आपल्या नावावर केली. वेगवेगळ्या देशात जाऊन मुंबई इंडियन्सने जिंकलेली ही आत्तापर्यंतची तब्बल ९ वी ट्रॉफी आहे.