दूध दरासाठी सरकारला दुधाची आंघोळ : रयत क्रांती संघटना करणार 1 ऑगस्टला आंदोलन

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

‘गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देत असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतक-यांना १६ ते २० रुपये एवढाच दर मिळतो. सरकारने गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर १० रुपये थेट अनुदान द्यावे. याशिवाय दूध पावडर निर्यातीला चालना द्यावी, या मागणीसाठी एक ऑगस्टला राज्य सरकारला दुधाची आंघोळ घालून आंदोलन करणार आहे,’ अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात रोज सुमारे दीड कोटी लिटर दुधाचे संकलन होते. राज्यातील अनेक शेतक-यांचा उदरनिर्वाह दूध उत्पादनावर आहे. दुधाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतक-यांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र तरीही दूध उत्पादक शेतक-यांना योग्य भाव मिळत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार आहे. याबाबत राज्यव्यापी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय रयत क्रांती संघटनेने घेतला आहे.

याबाबत माहिती देताना आमदार खोत म्हणाले, ‘गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देत असल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात मात्र शेतक-यांना हा दर मिळत नाही. सरकारने दूध उत्पादकांसाठी प्रतिलिटर १० रुपयांचे थेट अनुदान द्यावे. दूध पावडरीच्या निर्यातीसाठीही सरकारने चालना द्यावी. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी एक ऑगस्टला राज्यात सरकारला दुधाची आंघोळ घालणार. तहसीलदार, प्रांताधिका-यांना दूध भेट देणार. प्रसंगी दूध संकलनही बंद ठेवून शहरांचा दूध पुरवठा खंडित करू,’ असा इशाराही आमदार खोत यांनी दिला आहे.

मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयावरही आमदार खोत यांनी टीका केली. ‘राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांची व्यवस्था लावण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पदाचा लिलाव करू नये. प्रशासक नेमायचाच असल्यास ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिका-यांची नियुक्ती करावी. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मनमानी कारभाराला लगाम लावावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकरी कर्जमाफीची सखोल चौकशी करा

‘गरजू शेतक-यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदान योजनेचाही लाभ मिळालेला नाही. सांगली जिल्ह्यात विकास सोसायट्यांसह काही बोगस कर्जदारांनी शेतक-यांच्या कर्जमाफीवर डल्ला मारला. राज्यातही अनेक ठिकाणी असा प्रकार झाल्याचा संशय बळावला आहे. राज्यभर कर्मजमाफीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी,’ अशी मागणी आमदार खोत यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.