औरंगाबाद – मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन 2017 मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे विधिमंडळाच्या आश्वासन समितीच्या चौकशी अहवालात समोर आले आहे.
विद्यापीठात कुठल्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबवता मर्जीतील कंत्राटदाराकडून साहित्य खरेदी करणे, विद्यार्थी संख्येपेक्षा दुपटीने प्रश्नपत्रिकांची छपाई करण्याचे कंत्राट देणे, महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या संलग्नीकरण शुल्काची नोंद न ठेवणे, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन प्रश्नपत्रिका वितरणासाठी अधिक खर्च करणे आदी अनियमितताचा ठपका या चौकशी समितीने ठेवला आहे. विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून विविध प्रमाणात शुल्क आकारते ते शुल्क विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी वापरणे अपेक्षित असते. परंतु या विद्यापीठात या विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा गैरवापर झाल्याचे दिसून आले आहे.
विधिमंडळाच्या आश्वासन समितीच्या चौकशी अहवालात विद्यापीठात तब्बल 120 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. आता सत्ताधारी महाविकास आघाडी या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.