औरंगाबाद | तुमचे सीमकार्ड बंद हाेत असून केवासी नोंदणी करण्यासाठी अनोळखी ऍप इंस्टॉल करायला लावून कॉलवरील सायबर गुन्हेगाराने डॉक्टरला ३ लाख रुपयांचा गंडा घातला. घाटीतील ६१ वर्षीय डॉ. मोहन कोंडिबा डोईबळे यांच्यासोबत हा प्रकार घडला.
६ जुलै रोजी डोईबळे घरी होते. त्यांना एका अनोळख क्रमांकावरुन कॉल प्राप्त झाला होता. कॉल वरील व्यक्तीने स्वत:ला त्यांच्या सीमकार्ड ऑपरेटर कंपनीतून बाेलत असल्याचे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर केवायसी जोडणी नसल्याने तुमचे सीमकार्ड बंद होत असल्याचे सागितले. ते बंद पडू न देण्यासाठी मदत करुन तो जे सांगेल,तशी कृती करण्यास सांगितली. डाॅ. डोईबळे यांचा विश्वास बसला व कॉलवरील व्यक्तीने त्यांना टिम व्ह्युव्हर क्विक सपोर्ट ऍप मोबाईल मध्ये इंस्टॉल करण्यास सांगितले. या ऍप मुळे सायबर गुन्हेगारांना तुमच्या संपूर्ण मोबाईलचा ताबा मिळतो व तुमचा सर्व मोबाईल मधील हालचाल टिपतात.
डोईबळे यांनी ते इंस्टॉल केल्यानंतर कॉलवरील व्यक्तीने त्यांना त्याने दिलेल्या बँक खात्यावर दहा रुपये पाठवण्यास सांगितले. ते पाठवत असताना त्याने डोईबळे यांचा पैसे पाठवणाऱ्या ऍप मधील सर्व माहिती हेरली. व त्याच्या मदतीने तीन टप्प्यांमध्ये ३ लाख रुपये काढून त्याच्या खात्यावर वळते केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डोईबळे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. जवाहरनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक संतोष पाटील याप्रकरणी तपास करत आहेत.