सुशिक्षित तरुणांना लाखोंचा गंडा घालणारा पोलिसांच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – पोस्टात नोकरी लावण्याच्या आमिषाने तीन सुशिक्षित तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या बाजारसावंगी येथील आरोपीला खुलताबाद पोलिसांनी नेरळमधून अटक केली. रवी अबलुकराव नलावडे (रा. बाजारसावंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बाजारसावंगी येथील बाळू राधाकृष्ण नलावडे यांनी २१ एप्रिल रोजी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी नलावडे हा मुंबई येथे पोस्ट खात्यात नोकरीस असून, सन २०१८ मध्ये तो बाजारसावंगी येथे आला होता. या वेळी त्याने पोस्ट खात्यात जागा भरणार असून, नोकरीसाठी एका व्यक्तीला बारा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. सुरुवातीला तीन लाख रुपये द्यावे लागतील. बाकीचे पैसे नोकरीचे काम झाल्यानंतर द्यावे. काम न झाल्यास पैसे परत मिळतील, असे त्याने बाजारसावंगी येथील बाळू नलावडे, ताजनापूर येथील दीपक काळे आणि लोहगाव (ता. कन्नड) येथील प्रमोद सपाटे यांना सांगितले होते. बाळू नलावडे व दीपक काळे यांनी आरोपीच्या खात्यात बाजारसावंगी येथून प्रत्येकी तीन असे सहा लाख रुपये आणि प्रमोद सपाटे यांनी रवी नलावडे व पल्लवी नलावडे यांच्या खात्यात वेळोवेळी चार लाख ४१ हजार रुपये जमा केले.

मात्र, पैसे घेऊनही नोकरीस लावले नाही; तसेच पैसेही परत दिले नाहीत. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी कुटुंबीयांसह फरारी झाला होता. पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या पथकाने चार ऑगस्ट रोजी आरोपी रवी नलावडे याला नेरळ (ता. कर्जत) येथून अटक केली. यानंतर पोलिसांनी आरोपी रवी नलावडे याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सहा ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment