सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर शहरातील रस्त्यांचीही दुरावस्था झाली असून येथील रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. ते सध्या अपघाताला आमंत्रण देत आहेत. तर महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यांवरील खड्डयांनीही अक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. या रस्त्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या निसर्गरम्य वातावरण निर्माण झाल्यामळे पर्यटकांकडून मोठ्या संख्येने गर्दी केली जाते. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पावसामुळे सध्या दाट धुके पसरले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. महाबळेश्वरला जाताना घाटरस्ताही लागतो. त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वाहने जाऊन अपघातही होत आहेत.
सध्या महाबळेश्वरमध्ये धुकेमय वातावरण निर्माण झाले आहे. त्या धुक्यातून वाट काढत चालकांना आपली वाहने पुढे घेऊन जावी लागत आहेत. अशात रस्त्यावर पडलेल्या छोट्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रसंग त्यांच्यावर ओढवत आहेत. वाहनाचे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत, अशी मागणी प्रवाशी तसेच पर्यटकांमधून केली जात आहे.