राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे वागले, तेव्हाच त्यांनी पदाचा मान ठेवला नाही- बच्चू कडू

नागपूर | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. यावरुन राज्यात मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कृतीचे समर्थन करत राज्यपालांवर टीकेची तोफ डागली.

राज्यपाल गेल्या वर्षभरात भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच राज्यपालाच्या पदाचा सन्मान ठेवला नाही, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली. राज्यपालांना सरकारी विमानप्रवास नाकारणे हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले.

राज्य सरकारने सूडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांचा आदर करतात. एरवी राज्यपालांना महाराष्ट्र सरकारकडून हेलिकॉप्टर आणि विमान कायम उपलब्ध करुन दिले जाते. पण यावेळी तांत्रिक अडचणींमुळे तसे करता आले नाही. भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचे विमान वापरावे, थोडा फार त्यांच्यावरही टाकावा, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like