Wednesday, June 7, 2023

ओबीसी आरक्षणाबाबत तुमची कथनी एक आणि करणी एक ; छगन भुजबळांची फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण व इम्पिरिकल डेटाबाबत प्रश्न उपस्थित केला असता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुंपली. यावेळी ओबीसी आरक्षणाबाबत तुमची कथनी एक आणि करणी एक आहे, अशी टीका मंत्री भुजबळ यांनी फडणवीसांवर केली.

राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ओबीसी आरक्षणाचा मुदा आज दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांकडून चर्चेसाठी घेण्यात आला. यावेळी सुरुवातीला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या इम्पिरिकल डेटाबाबत माहिती दिली.

त्यावेळी मंत्री भुजबळ यांनी थेट फडणवीसांवर आरोप केला. मंत्री भुजबळ म्हणाले की, ओबीसी समाजाचे इतर नेते जसे आरक्षणाबाबत कोर्टात जातात. मात्र भाजप नेते का जात नाहीत. याची कथनी एक आणि करणी एक अशी आहे. का इम्पिरिकल डाटा देत नाही हे सांगावे? अशी मागणी यावेळी मंत्री भुजबळ यांनी केली.

यावर फडणवीस म्हणाले की, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यांवरून भुजबळांनी कोणत्याही स्वरूपाचे राजकारण करू नये. तुमच्या काळात कोरोना नव्हता, इंपेरिकल डेटा का गोळा केला नाही? आमच्या काळात ट्रिपल टेस्ट करायला सांगितले नाही. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर आरोप केला. भाजपमुळेच ओबीसी आरक्षण गेले, असा आरोप पटोले यांनी केला.