Wednesday, June 7, 2023

अंबानींच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यापूर्वीच बच्चू कडूंना नागपुरातचं रोखलं; वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाई?

नागपूर | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. (Bacchu Kadu was stopped by the Nagpur police)

बच्चू कडू थांबलेल्या विश्रामगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजताच्या विमानाने बच्चू कडू मुंबईला रवाना होणार होते. त्यांना विमानतळावर सोडण्यासाठी त्यांची गाडीही तयार होती. पण पोलिसांनी त्यांना विश्रामगृहाच्या दारातच अडवून धरलं. नागपूर पोलिसांनी अडवल्यानंतर आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून दुसऱ्या विमानाने मुंबईला रवाना होण्याबाबत विचारणा करणार असल्याचं कडू यांनी सांगितलं. आमच्या आंदोलनामुळे दिल्लीतील आंदोलनावर काही विपरीत परिणाम होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असावी, त्यामुळे आपल्याला इथं रोखलं जात असल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय.

मोदी-शाह अंबानींचं ऐकतात म्हणून.. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे अंबानींचं ऐकतात म्हणून रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. रिलायन्स कार्यालयात अंबानींना भेटण्यासाठी जात आहे. रिलायन्स कार्यालहाबाहेरील हे आंदोलन आज संपेल की जास्त चालेल हे सांगता येत नसल्याचंही बच्चू कडू म्हणाले. या आंदोलनात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढावही सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्याशी रिलायन्स कंपनीचा काही संबंध नसल्याचं कंपनी आणि सरकारकडूनही स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘दिल्लीतील आंदोलन वर्षभरही चालू शकतं’
दिल्लीच्या सीमेवर गेल्या 26 दिवसांपासून सुरु असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अशांततेकडे जाण्याची शक्यता बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. तसंच दिल्लीतील आंदोलन वर्षभरही चालू शकतं, असंही बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, बच्चू कडू हे आपल्या कार्यकर्त्यांसह दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुचाकीवर गेले होते. त्यावेळी त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धरलं होतं.

रावसाहेब दानवेंवर घणाघाती टीका
“रावसाहेब दानवे यांचे म्हणणे दुर्दैवी आहे. त्यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे; की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली आहे. दिल्लीतील आंदोलनामागे पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं. त्यावरुन बच्चू कडू यांना दानवेंचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने औरंगाबादेत रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दानवे यांच्या घरासमोर रक्तदान करुन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घरासमोर बसून घोषणाबाजी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’