सातारा | पोलिस कर्मचाऱ्यांनी वर्दी न घातल्याने गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. शंभूराज देसाई यांनी दुचाकीवरुन फेरफटका मारत सातारा शहर पोलिस ठाण्यास अचानक भेट दिली. भेटीदरम्यान त्याठिकाणी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून त्यांनी विविध विषय, गुन्हे यांची माहिती घेत कामचुकार अधिकाऱ्यांबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
आज सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्या पोवईनाका येथील कोयना दौलत या निवसास्थानातून दुचाकीवरुन बाहेर पडले. दरवेळी पुढेपाठीमागे असणारा शासकीय वाहनांचा ताफा जागेवरच थांबवत श्री. देसाई हे दुचाकी घेवून पोवई नाक्याकडे मार्गस्थ झाले. येथून ते पोलिस मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन सातारा शहर पोलिस ठाण्यात आले. येथे आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या विविध भागांची पाहणी करत त्याठिकाणी चौकशी, गुन्ह्याच्या तपासासाठी आणलेल्यांची तसेच उपस्थित असणाऱ्या पोलिस कर्मचारी, अधिकारी यांची विचारपूस केली.
यानंतर त्यांनी ठाणाधिकाऱ्यांच्या खुर्चीत ठाण मांडले. यानंतर त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत घडलेले गुन्हे आणि त्यातील गुन्हेगारांवर काय कारवाई केली, याबाबतची घेतली. माहिती घेत असतानाच त्यांनी पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पोलिस ठाण्यात आल्याचे मेसेज वायरलेसवरुन देण्यास सांगितले.