नाशिक प्रतिनिधी | पेठ तालुक्यातील खरपडी येथील शासकीय आश्रमशाळेतील सहावीतील मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडला असून, त्याच शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याविरुद्ध मुलीच्या पालकांनी हरसूल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
मुलगा आणि मुलगी हे दोघेही पेठ तालुक्यातील खामखेडा येथील रहिवासी असून, ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलींची नियमित आरोग्य तपासणी होत असते. मात्र, तीन महिने उलटले तरी याबाबत आश्रमशाळेच्या अधीक्षकांना हा प्रकार कसा लक्षात आला नाही, याबाबत चर्चा होत आहे. या प्रकरणाने आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या पालकांपासून दूर राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा प्रकार रविवारी उघड झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या दोघांचेही लग्न लावून देण्याची तयारी दोन्ही कुटुंबांनी दाखवली; मात्र दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, हरसूल येथे ग्रामीण रुग्णालय असताना त्र्यंबकेश्वर येथे वैद्यकीय तपासणी करता येणार नाही, म्हणून त्यांना परत पाठविले.