मिशन जिल्हा बॅंक निवडणूक : उदयनराजेंचे कालेत भीमरावदादांशीही कमराआड चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूकीच्या संदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमवारी दि.8 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत कराडात ठिय्या मांडला होता. या दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. रात्री उशिरा छ. उदयनराजे यांनी काले गावचे सुपुत्र आणि जेष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांच्या राहत्या घरी भेट देऊन चर्चाही केली.

काले येथे सदिच्छा भेटीप्रसंगी कृष्णा साखर कारखान्यांचे संचालक दयानंद पाटील, सुनील काटकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक हणमंतराव पवार आदि उपस्थित होते. जेष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांची कराड तालुक्यातील राजकारणावर चांगली पकड आहे. यामुळेच उदयनराजे भोसले यांनी थेट त्यांच्या काले येथील घरी जाऊन जिल्हा बँक निवडणूकीबाबत चर्चा केल्याचं समजत आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही मागील आठवड्यात भीमराव दादांची भेट घेतली होती.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. बुधवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय गाठीभेटींना जिल्ह्यात जोर आला आहे. या भेटीपूर्वी उदयनराजे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कराड येथे जाऊन भेट घेतली होती. तसेच उदयसिंह उंडाळकर यांच्याशी ही तब्बल दीड तास बंद कमराआड चर्चा केली.

Leave a Comment