औरंगाबाद | शहरातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, निराधार, वृद्ध आणि बाकीचे सर्वसामान्य नागरिक यांची कामे बऱ्याच वर्षांपासून तहसील कार्यालयात पेंडिंगवर आहेत. हे नागरिकांनी इम्तियाज जलील यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्याचबरोबर तहसील कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी मानसिक त्रास देत असल्याचे देखील समोर आले आहे. याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात मिशन तहसील या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.
काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे तहसील कार्यालयाची प्रतिमा मलीन झाली आहे. तहसील कार्यालयात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी, काही कामांसाठी गेल्यावर त्याठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवतात, आणि याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली असता ती फाईलच गायब केली जाते. आणि मानसिक त्रास दिल्या जातो असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे.
तक्रारदारांची अडवणुक करणे, प्रशासकीय नियम आणि मार्गदर्शक तत्वांचा भंग करणे, गैरवर्तवणुक करणे, अधिकारांचा गैरवापर करणे, शासकीय कामात दिरंगाई करुन कर्तव्यात कसुर करणे यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील तरतुदींचा भंग होत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडवा, प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे निर्देश खासदार इम्तियाज जलील यांनी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले. इम्तियाज जलील यांनी सुरू केलेले मिशन तहसील कार्यक्रमाचा पहिला टप्पा 20 जुलै पासून सुरु करण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयात नागरिकांचे वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न, समस्या, तक्रारी, कामे, अर्ज, निवेदनांचा यशस्वीरित्या पाठपुरावा करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.