बोंडारवाडी धरण प्रकल्पाची शिवेंद्रसिंहराजेंकडून पाहणी; ग्रामस्थांचा विरोध चर्चेने सोडवण्याचं दिलं आश्वासन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा- जावली तालुक्यातील केळघर, मेढा विभागातील ५४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे काम मार्गी लागणे आवश्यक आहे. बोंडारवाडी ग्रामस्थांनी काही मागण्यांसाठी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. ग्रामस्थ, बोंडारवाडी धरण कृती समीती आणि पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. सर्वसमावेशक तोडगा काढून जावली तालुक्यात ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी लवकरच बोंडारवाडी धरणप्रकल्पाचे काम मार्गी लावू, असे आश्‍वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

बोंडारवाडी ग्रामस्थांनी पिकाऊ शेतजमीन वाचावी आणि धरणाचे काम व्हावे, अशी मागणी करुन या प्रकल्पाला विरोध केला होता. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्यक्ष धरणस्थळ आणि जागेची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता महादेव धुळे, सहायक अभियंता (श्रेणी १) जयंत बर्गे, शाखा अभियंता संजय पांडकर, सरपंच बाजीराव ओंबळे, वसंत मानकुमरे, संदीप ओंबळे, गणपत ओंबळे, विष्णू ओंबळे, महेंद्र ओंबळे यांच्यासह बोंडारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून केळघर, मेढा विभागातील गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्प मंजूरीसाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरु ठेवला होता. बोंडारवाडी ग्रामस्थ, कृती समिती आणि पाटबंधारे विभाग यांचा समन्वय साधून या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रयत्न सुरु आहे. बोंडारवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिवेंद्रसिंहराजे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांसोबत धरणस्थळाची पाहणी केली. ज्या जोगवर धरण होत आहे त्या जागेत ग्रामस्थांची शेतजमीन जात आहे. आमची शेतजमीन वाचावी, अशी मागणी ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली. ५४ गावांचा पाणीप्रश्‍न आणि बोंडारवाडी ग्रामस्थांची शेतजमीन या दोन्ही बाबींचा विचार करुन सर्वांच्या सहमतीने, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेवून धरणाचे काम मार्गी लागेल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ग्रामस्थांना सांगितले. काहीही झाले तरी बोंडारवाडी प्रकल्पाचे काम मार्गी लावू आणि ५४ गावांचा पाणीप्रश्‍न सोडवू, असेही ते म्हणाले.

कशाचीही तमा न बाळगणारा लोकप्रतिनिधी

आ. शिवेंद्रसिंहराजे जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी काहीही करतात, हे बोंडारवाडीच्या प्रश्‍नावरुन पुन्हा एकदा सिध्द झाले. बोंडारवाडी धरणस्थळाची पाहणी करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना ६ किलोमीटर चालत जावे लागले आणि पुन्हा ६ किलोमीटर चालत माघारी यावे लागले. ग्रामस्थांचा प्रश्‍न समजून घेण्यासाठी चिखल, पावसाची तमा न बाळगता ते स्वत: धरणस्थळी गेले. प्रश्‍न नीट समजावून घेतला. उपस्थित अधिकार्‍यांना ग्रामस्थांचा प्रश्‍न सोडवण्याच्या सुचना केल्या आणि पुन्हा माघारी आले. एकूणच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणारा नेता असं शिवेंद्रराजे यांचं रुप पुन्हा एकदा नागरिकांना पाहायला मिळालं.

विष कालवणार्‍यांपासून सावध रहावे

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बोंडारवाडी प्रकल्पाला मंजूरी मिळवली होती. दुर्देवाने भाजपाचे सरकार आले नाही. सरकार कोणाचेही असले तरी मी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला आहे आणि करणार आहे. महाआघाडी सरकारकडेही पाठपुरावा करुन हा प्रकल्प मार्गी लावणार आहे. सोशल मिडीयावर विनाकारण वावड्या उठवायच्या, लोकांच्या मनात विष कालवायचं अशा काही विकृतीं सध्या फोफावल्या आहेत. त्यांना फोटो शूट करुन गाजावाजा करायची फार हौस असते. मला श्रेयवादात पडायचे नाही आणि मला श्रेयही घ्यायचे नाही. मला फक्त जनतेचे प्रश्‍न सोडवायचे असतात आणि ते मी सोडवतोच. स्वत: काहीही करायचं नाही. काम झालं तर मी केलं म्हणायचं आणि झालं नाही तर आमदारावर ढकलायचं अशा प्रवृत्तींपासून जावलीकरांनी सावध रहावं. सातारा- जावली या मोठ्या मतदारसंघात आमदार म्हणून पहिल्या दिवसांपासून मी काम करत आहे. काम करताना कधीही दुजाभाव केला नाही. कास धरणाचे काम पुर्वीच सुरु होते. निधी अभावी रखडल्याने अजित पवार यांच्या सहकार्याने वाढीव निधी मंजूर करुन घेतला. मेडीकल कॉलेजही पुर्वीच मंजूर होते आणि ते संपुर्ण जिल्ह्याचे आहे. तसेच हद्दवाढीचा प्रस्तावही बरेच वर्ष प्रलंबीत होता, तो मंजूर करुन घेतला. मात्र यावरुन जावलीकडे दुर्लक्ष केलं असा अर्थ विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी काढला. बोंडारवाडीसाठी माझा पाठपुरावा कसा आहे हे ग्रामस्थ, कृती समिती आणि सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे गैरसमज पसरवणार्‍या विकृतीपासून जनतेने सावध रहावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

Leave a Comment