हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलाने मनसेतून अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनसेचे पहिले महाअधिवेशन मुंबईत सुरु आहे आणि इकडे नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नरेंद्र पाटील यांनी मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.
नरेंद्र पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर पाटील यांनी मनसेच्या तिकीटावर धुळ्यातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांच्या आतच नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकून सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
अल्पसंख्याक सेलची बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन यासारखे नेते उपस्थित होते.