अव्वाच्यासवा वीजबील आकारणीला तात्काळ चाप लावा! राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात भरमसाठ पाठविण्यात आलेल्या वीजबिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक झाली आहे. हा प्रश्न त्वरीत सोडविण्यात यावा, अशी मागणी मनसेनेने केली आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीले आहे. अव्वाच्यासवा वीज बील आकारणीला तात्काळ चाप बसायलाच हवा. वीजबिलात तात्काळ सूट द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

कोरोनाच्या या लढाईत बहुदा राज्य सरकारचे एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होते आहे. या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसाव्यात आणि म्हणूनच या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचे लक्ष वेधून घेऊ इच्छिते. खासगी वीज कंपन्या असोत, महावितरण असो की बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे, असा हल्लाबोल मनसेकडून करण्यात आला आहे.

वीज कंपन्यांकडून अवाजवी बिले पाठविण्यात आली आहेत. ही बिले रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे . मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेले, असा आरोप राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापनं देखील गेली ३ महिने बंद होती तरीही त्यांना सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्यासवा बिलं आकारली गेली आहेत. टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत, अनेक ठिकाणी पगारकपात झाली आहे तर अनेक आस्थापनांनी नोकरकपात सुरु केली आहे अशा वेळेस जिथे उदरनिर्वाहाचीच शाश्वती नसताना तिथे ही वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे. कोरोनाची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि भविष्यात देखील राहतील पण या अशा विषयांत जनता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करून घेऊ नये, असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज्याला महसुलाची अडचण आहे हे सर्वाना मान्यच आहे पण म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणे हा मार्गच असू शकत नाही. म्हणूनच या विषयात मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालावं आणि या वीजबिलात तात्काळ सूट द्यावी तसेच ही सूट कोणत्याही प्रकाराने भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करु नये. राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थपानांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खासगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी अन्यथा या खासगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment