ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

0
1
Amit Thackeray Letter To CM Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी कार्यालयात “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे आपलं ‘राज्य गीत’ लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याना लिहिलं आहे. तसेच हा निर्णय उद्या २७ फेब्रुवारी म्हणजेच ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पूर्वसंध्येला घेतल्यास आनंदच होईल असेही त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे सरकार आता अमित ठाकरे यांची मागणी पूर्ण करणार का ते पाहावं लागेल.

अमित ठाकरेंचं पत्र जसच्या तसे –

प्रति,
श्री. एकनाथ शिंदे साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!

जे गीत ऐकताच महाराष्ट्रातील मराठी जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो, ज्या गाण्याने प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…” ह्या कै. गीतकार राजा बढे लिखित आणि कै. शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेल्या गीताला गेल्या वर्षी दि. १ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्राचे ‘राज्य गीत’ असा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अधिकृत शासकीय कार्यक्रमात ह्या राज्य गीताचे गायन करणे किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते गायले जावेच- लावले जावेच हा आमचा आग्रह आहे.

शासकीय परिपत्रकानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात अध्ययन वर्ग सुरू होण्यापूर्वी “जन गण मन अधिनायक जय हे…” ह्या आपल्या राष्ट्रगीताचे गायन करणे अनिवार्य आहे. राष्ट्रगीताचा मान राखण्याबाबत शालेय स्तरापासून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या राज्य गीताचे महत्व भावी पिढ्यांना- विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना आपल्या अत्यंत प्रेरणादायी राज्य गीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक शाळा तसंच महाविद्यालयात राज्य गीताचे गायन अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांत प्रवेश करताच विद्यार्थी सहज वाचतील अशा ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या दर्शनी भागात एका मोठ्या फलकावर अथवा भिंतीवर ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे संपूर्ण राज्य गीत लिहून त्याला कायमस्वरुपी ठळक प्रसिद्धी देण्याचे आदेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावेत. त्याच प्रमाणे, बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागातही आपले राज्य गीत लावण्यात यावे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या मागण्यांचा आपण गांभीर्याने विचार करावा, ही विनंती. उद्या २७ फेब्रुवारी. ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पूर्वसंध्येला आपण याबाबतचा शासकीय आदेश काढला तर सर्वांना निश्चितच आनंद होईल असं अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हंटल आहे.