पाटण | कराड-चिपळूण रस्ता कॉंक्रीटीकरणाच्या निकृष्ठ कामाच्या विरोधात व रस्ता कामाच्या दिरंगाईबाबत पाटण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटण तहसील कार्यालयासमोर सोमवार दि. 15 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, या कामाची तातडीने चौकशी करून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी. तसेच सदर कंपनीला काळ्या यादीत टाकावे ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. विकास पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर बोलताना दिला आहे.
कराड-चिपळूण या रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरू असून झालेले कामही अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे. या रस्त्याच्या कामाचा कालावधी पूर्ण होवून दोन वर्षे उलटले तरी अद्याप रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. सदर काम कंपनीने अर्धवट सोडून बंद केलेले आहे. कंपनीचे अधिकारी कोरोना, शेतकरी अडथळा निर्माण करत असल्याची कारणे देत आहेत. नवारस्ता, मल्हारपेठसह पाटण, कोयनानगर येथील ठिकठिकाणची कामे अर्धवट असून यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अर्धवट कामांमुळे अनेकजणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम हा वाहतुकीवर झालेला आहे. झालेल्या कामांची बिलेही कंपनीने काढली आहेत.
या निकृष्ठ कामांची तातडीने चौकशी करण्यात येवून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फौजदार कारवाई करण्यात यावी. तसेच या रस्त्याचा ठेका घेतलेल्या एल अँड टी कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, या मागणीसाठी पाटण तालुका मनसेच्यावतीने पाटण तहसील कार्यालयासमोर सोमवार दि. 15 पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
या आंदोलनास मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, कोयनानगर अध्यक्ष दयानंद नलवडे, राजू केंजळे, मीनाक्षी पोळ, सागर बर्गे, विजय वाणी, संजय सत्रे, राहूल संकपाळ, नंदा चोरगे, जोत्स्ना कांबळे, अंकुश कापसे, हणमंत पवार, दीपक मुळगावकर, संभाजी चव्हाण, समर्थ चव्हाण, अधिक पाटील यांच्यासह मनसैनिक सहभागी झाले आहेत.