पाचगणी -महाबळेश्वर मधील व्यवसाय सुरू करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे तहसिलदारांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर | कोरोनाचे सर्व नियम पाळून पाचगणी -महाबळेश्वर मधील व्यवसाय सुरू करणेस परवानगी द्यावी असे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने आज महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील यांना आज निवेदन देण्यात आले.

महाबळेश्वर -पाचगणी ही पर्यटन स्थळे कोरोनाच्या महामारीमुळे सातत्याने बंद आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटन व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या संपूर्ण जनतेचे आर्थिक व मानसिक दृष्ट्या कंबरडे मोडले आहे. प्रशासनाने मागील काही दिवसात व्यवसाय काही प्रमाणात सुरू केला, पण थोड्याच दिवसात कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू असणारा व्यवसाय पुन्हा बंद करणे हे फार अन्यायकारक आहे. आज महाबळेश्वर तालुक्यातील पर्यटन व्यवसायावर आधारित असलेले हॉटेल मालक त्यांचे कर्मचारी, छोटे- मोठे व्यवसाय असणारा व्यापारी वर्ग, टॅक्सी – टुरिस्ट व्यवसायांवर अवलंबून असलेला वर्ग, घोडे व्यावसायिक वर्ग, तसेच महाबळेश्वर तालुक्यातील इतर व्यावसायिक यांची आर्थिक घडी संपूर्णतः विस्कळीत झाली असताना, आम्हा महाबळेश्वर तालुक्यातील सर्व रहिवाशांसाठी स्वतः च्या जिवा इतकेच आपल्या कुटुंबाला जगण्यासाठी पैसे कमवणे हे अत्यंत गरचेचे आहे. आधीच प्रशासनाचे सर्व प्रकारचे कर सर्वांना भरावे लागत आहेत. त्यामध्ये लॉकडाऊनमुळे कोणत्याही प्रकारची सूट प्रशासनाकडून दिली गेली नाही.

त्यामुळे वारंवार लॉकडाऊन लादत असताना प्रशासनाने सामान्य जनतेचा कोणताही विचार केला नाही हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व व्यवसाय चालू झाले नाहीत तर तालुक्यातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने महाबळेश्वर तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे, व्यवसाय, व्यापार, टॅक्सी व्यवसाय, घोडे व्यवसाय व इतर व्यवसाय कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू करणेस परवानगी द्यावी. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार, महाबळेश्वर उपतालुका अध्यक्ष नितीन पार्टे, वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष विशाल गोळे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ओंकार पवार, महाराष्ट्र सैनिक अर्जुन सकंपाळ व गणेश भिलारे उपस्थित होते.

Leave a Comment